अपात्र ६ संचालकांच्या निर्णयाला न्यायालयाची स्थगिती

एपीएमसी संचालकांच्या बैठकांचा मार्ग मोकळा

वाशी : पणन संचालकांनी अपात्र ठरविलेल्या ‘एपीएमसी'च्या ६ सदस्यांच्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आधीचे ८ आणि आता ६ संचालक पात्र ठरले असून ‘मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती'च्या संचालक मंडळ सभेसाठी आवश्यक सदस्यांची गणपूर्ती (कोरम) पूर्ण होत आहे. त्यामुळे संचालक मंडळाच्या सभेचा मार्ग मोकळा झाला असून सभापती अशोक डक यांनी ‘एपीएमसी' संचालक मंडळाची सभा त्वरित आयोजित करण्याबाबत सचिवांना निवेदन पाठवले आहे.

मागील वर्षी मे २०२२मध्ये पणन संचालकांनी राज्यातील त्या-त्या विभागातील एपीएमसी संचालकांचे तेथील पद रद्द झाल्याने ‘एपीएमसी'मधील संचालक पद अपात्र ठरवले होते. तसेच डिसेंबर मध्ये निर्णयाची टांगती तलवार असल्याने सभापती अशोक डक आणि उपसभापती धनंजय वाडकर यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर कांदा-बटाटा बाजारातील संचालक अशोक वाळुंज यांच्यासह इतर संचालक देखील अपात्र ठरवण्यात आले होते. परिणामी, संचालक मंडळाची बैठक घेण्यासाठी गणपूर्ती अपूर्ण असल्याने बैठका ठप्प होत्या. त्यामुळे ‘एपीएमसी'तील धोरणात्मक निर्णय खोळंबले असून अत्यावश्यक कामे देखील रखडली आहेत. त्याचबरोबर संचालक मंडळाची गणपूर्ती पूर्ण नसल्याने संचालक मंडळ अकार्यक्षम ठरत असून बरखास्त करणे बाबत पणन संचालकांनी हालचाली सुरु केल्या होत्या.

त्यावर नागपूरचे संचालक सुधीर कोठारी यांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर पणन विभागाच्या संचालक बरखास्तच्या प्रक्रियेला न्यायालयाने स्थगिती दिली होती. आता पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाने मागील वर्षी मे महिन्यात अपात्र ठरवलेल्या ६ संचालकांच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे सदर ६ अपात्र संचालक आता पात्र असून त्यामुळे संचालक मंडळाची ११ची गणपूर्ती पूर्ण होत आहे. त्यानुसार सभापती अशोक डक यांनी एपीएमसी प्रशासनाला लवकरात लवकर संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्याबाबत निवेदन दिले आहे. त्यामुळे ‘एपीएमसी'चे धोरणात्मक निर्णय मार्गी लागण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ येथील रामलीला मैदानावर तेरणा संस्थेचा दावा