टायर रिट्रेडींग प्रकल्पाद्वारे एनएमएमटी उपक्रम स्वयंपूर्ण

नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाच्या खर्चात १५ ते २० टक्के बचत अपेक्षित

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमातील बसेसना लागणारे टायर झीज झाल्यानंतर रिट्रेडींग करुन पुनः वापरात आणले जातात. सदर रिट्रेडींगचे काम बाह्य एजन्सीद्वारे करण्यात येत होते. परंतु, आता विविध बाबींमध्ये एनएमएमटी उपक्रम स्वयंपूर्ण होत असताना टायर रिट्रेडींगचे कामही उपक्रमामार्फत केले जावे आणि यामधून उपक्रमास आर्थिक लाभ व्हावा यादृष्टीने एनएमएमटी उपक्रमाच्या आसुडगांव आगारात टायर रिट्रेडींगचा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. सदर प्रकल्प महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आला.

याप्रसंगी परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक योगेश कडुसकर, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा-वित्त अधिकारी तुषार दौंडकर, यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता  विवेक अचलकर, मुख्य वाहतूक अधिकारी अनिल शिंदे, आसुडगांव आगार व्यवस्थापक उमाकांत जंगले, प्रशासन अधिकारी दिपिका पाटील यांच्यासह उपक्रमातील अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यापूर्वी सदर काम कंत्राटदारामार्फत ई-निविदाद्वारे करण्यात येत होते. यासाठी वार्षिक साधारणतः ६० ते ७० लाख रुपये इतका खर्च होत होता. त्यामुळे परिवहन उपक्रमाने नियोजन करुन स्वतःचा टायर रिट्रेडींग प्रकल्प उभारण्याचे निश्चित करुन त्यादृष्टीने कार्यवाही सुरु केली. त्याकरिता मे. इल्जी रबर कंपनी यांच्यामार्फत २२ लाखाची टायर रिट्रेडींग मशीनची खरेदी करुन त्यामार्फतच प्रकल्पाची उभारणी केली. विशेष म्हणजे या प्रकल्पाकरिता मशीनचा खर्च एकदाच करावयाचा असून मशीनचे आयुर्मान १० ते १२ वर्षे इतके आहे.

परिवहन उपक्रमातील झीज झालेले टायर रिट्रेडींगकरिता केवळ कच्चा माल दरवर्षी घ्यावा लागणार आहे. टायर रिट्रेडींग कामाबाबत परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांना इल्जी रबर कंपनीमार्फत रिट्रेडींगचे प्रशिक्षण देण्यात आले असून प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फतच झीज झालेल्या टायरचे रिट्रेडींग करण्यात येणार आहे.  याकरिता अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता असणार नाही.

टायर रिट्रेडींग प्रकल्पामुळे एनएमएमटी उपक्रमास एका वर्षात साधारणतः ५५० ते ६०० रिट्रेड केलेले टायर वेळेत उपलब्ध होऊन टायरअभावी बसेस नादुरुस्त राहणार नाहीत. यामुळे बसेसचे दैनंदिन संचलन सुस्थितीत राहणार असून प्रवाशी जनतेस वेळेत बस उपलब्ध करुन देणे सुलभ होईल. पर्यायाने उपक्रमाच्या उत्पन्नात वाढ होणार असून टायर रिट्रेडींग करतेवेळी टायरचे खराब झालेले रबरही भंगारात विक्री करता येईल. या टायर रिट्रेडींगच्या कामामुळे परिवहन उपक्रमाच्या खर्चात साधारणतः १५ ते २० टक्के बचत होणे अपेक्षित असून याद्वारे एनएमएमटी उपक्रम अधिक स्वयंपूर्ण होणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अपात्र ६ संचालकांच्या निर्णयाला न्यायालयाची स्थगिती