ठेकेदारांचे हित जोपासणाऱ्या एनएमएमटी प्रशासनाविरोधात संतापाची भावना

‘एनएमएमटी'चे बसथांबे प्रवाशांच्या सोयीसाठी की ठेकेदाराच्या फायद्यासाठी?

तुर्भे : ‘नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम'ने (एनएमएमटी) अनेक ठिकाणी उभारलेले बसथांबे प्रवाशांच्या सोयीसाठी की ठेकेदाराच्या फायद्यासाठी? असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. यासंदर्भात प्रवाशांनी तक्रार करुनही त्याची एनएमएमटी प्रशासनाकडून नोंद घेतली जात नाही. त्यामुळे केवळ ठेकेदारांचा विचार करणाऱ्या एनएमएमटी प्रशासना विषयी प्रवाशांमध्ये संतापाची भावना आहे.

‘नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम'ने (एनएमएमटी) बांधा, वापरा, हस्तांतरीत करा या तत्वावर शहरात शेकडो बसथांबे ठेकेदारांच्या माध्यमातून उभारले आहेत. यामध्ये बसथांबे उभारण्यासाठी सर्व खर्च ठेकेदाराने करायचा आणि त्या बदल्यात या थांब्यावर जाहिरात करुन मिळणाऱ्या उत्पन्नातील किरकोळ हिस्सा ‘एनएमएमटी'ला देऊन अधिक फायदा ठेकेदाराला मिळत आहे. विशेष म्हणजे ठेकेदाराला मिळणारी रक्कम हजारोच्या नव्हे तर कोट्यवधीच्या घरात आहे.

शहरात अनेक बसथांबे प्रवाशांच्या नव्हे तर थांबे उभारणाऱ्या ठेकेदाराच्या फायद्यासाठी उभारल्याचे चित्र आहे. यामध्ये वाशी डेपो येथे कोपरखैरणेकडे तसेच पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर जेथे एक थांबा प्रवाशांना पुरेसा असताना त्या थांब्यालगतच आणखी एक ते दोन थांबे उभारले गेले आहेत. या अतिरिक्त थांब्यावर प्रवाशी नव्हे तर टाईमपास करणाऱ्यांचे ते अड्डे झाले आहेत. सानपाडा मधील बधाई चौक, मिलेनियम टॉवर येेेथे एकही बस मार्ग कार्यरत नसताना बसथांबे मात्र दिमाखात ठेकेदाराचे खिसे भरत आहेत.

तुर्भे आयसीएल शाळेच्या जवळील एक बस थांबा सर्व्हिस रोडवर आहे; मात्र या रोडवर एकही बस जात नाही. परंतु, त्यावर लाखो रुपयांच्या जाहिराती दिमाखात झळकत आहेत. प्रवाशांना या थांब्याचा कोणताही फायदा नसल्याने चक्क येथील एका रिक्षा एजंटने त्याठिकाणी भंगार रिक्षा पार्क केल्या आहेत. तसेच मयुरेश कॉम्प्लेक्स मध्ये येणारे लोक सदर ठिकाणी थांब्याच्या सावलीत गाडी पार्क करत आहेत. तर दुसरीकडे याठिकाणी प्रवाशी रणरणत्या उन्हात तळपत बसची वाट पहात असल्याचा विरोधाभास आहे. त्यामुळे बसथांबा मुख्य मार्गावर लावण्यात यावा, अशी मागणी वारंवार प्रवाशांकडून केली जात आहे. मात्र, एनएमएमटी प्रशासनाकडून सदर मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
बसथांब्यांवर जाहिराती करुन कोट्यवधी रुपयांचा नफा ठेकेदारांच्या खिशात जात आहे. यामध्ये काही लोकप्रतिनिधींचाही ‘हिस्सा' असल्याने कोणीही या विषयी आवाज उठवत नाही. तसेच सर्वपक्षीय तथाकथित लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक यांच्या वाढदिवसाचे फलक या थांब्यावर फुकटात लावले जात आहेत. याकडे प्रशासन मात्र कानाडोळा करताना दिसत आहे. सदर समस्येची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नोंद घेऊन प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे. तसेच शहरातील अतिरिक्त बस थांब्याची चौकशी करुन जे थांबे प्रवाशांच्या नव्हे, तर ठेकेदारांच्या फायद्यासाठी उभारण्यात आले आहेत ते काढून टाकून पारदर्शी कारभाराचा आदर्श आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घालून द्यावा, अशी चर्चा नवी मुंबईकरांमध्ये आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका आयुक्त नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न