नवी मुंबईचा पाणी पुरवठा सुरळीत

उपलब्ध होणाऱ्या पाण्याचे जपून, काटकसरीने वापर करण्याचे महापालिकातर्फे आवाहन

नवी मुंबई : मागील आठवडाभर तांत्रिक अडचणींमुळे विस्कळित पाणी पुरवठ्यामुळे नवी मुंबईकर नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. त्यामुळे पाणी पुरवठा वितरणामधील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिका पाणी पुरवठा विभागामार्फत आवश्यक कामे तत्परतेने करुन घेण्यात आली असून शहर अभियंता संजय देसाई यांच्या नियंत्रणाखाली, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील आणि पाणी पुरवठा विभागाने नियोजन करुन संपूर्ण पाणी पुरवठा यंत्रणा पूर्ववत कार्यान्वित केलेली आहे. त्यामुळे १२ जून पासून नवी मुंबईतील पाणी पुरवठा सुरळीत सुरू झाला असून ४७२.८७ द.ल.लि. पाणी पुरवठा करण्यात आलेला आहे


‘एमआयडीसी'मार्फत २ आणि ३ जून रोजी दुरुस्ती कामांसाठी शटडाऊन घेण्यात आले होते. तसेच ७ जून रोजी नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरण मुख्य जलवाहिनीवर आणि भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र येथे मान्सूनपूर्व पाणी पुरवठा संबंधी आवश्यक कामे करण्याकरिता शटडाऊन घेण्यात आले होते. त्यातच १० जून रोजी महापालिकेच्या मोरबे धरण प्रकल्पाची २०२४ मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी आदई गावाजवळ फुटल्यामुळे नमुंमपा क्षेत्रास कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात आला होता. सदर दुरुस्ती काम तातडीने हाती घेण्यात येऊन अहोरात्र काम करुन युध्दपातळीवर पूर्ण करण्यात आले. अशा रितीने मागील आठवडाभर तांत्रिक अडचणींमुळे विस्कळित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. या कालावधीत अडचणी समजून घेऊन नवी मुंबईकर नागरिकांनी महापालिका प्रशासनास चांगले सहकार्य केले.

पाणी पुरवठा वितरणामधील तांत्रिक अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिका पाणी पुरवठा विभागामार्फत आवश्यक कामे तत्परतेने करुन घेण्यात आली. शहर अभियंता संजय देसाई यांच्या नियंत्रणाखाली पाणी पुरवठा विभागाने नियोजन करुन संपूर्ण पाणी पुरवठा यंत्रणा पूर्ववत कार्यान्वित केलेली आहे. त्यामुळे १२ जून पासून नवी मुंबईतील पाणी पुरवठा सुरळीत सुरु झाला आहे.

नवी मुंबईकर नागरिकांनी पाणी पुरवठा यंत्रणेमध्ये आलेल्या आकस्मिक अडचणींमुळे पाणी पुरवठा व्यवस्थेवर झालेला परिणाम लक्षात घेऊन जे सहकार्य केले त्याबद्दल आभार व्यक्त करतो. पाऊस अजुनही सुरु झालेला नसल्याने नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्याला उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

६१४ महिला आणि मुली यांना व्यवसाय प्रशिक्षण