पनवेल महापालिका नवीन मुख्यालय इमारतीच्या आरेखनाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

पनवेल महापालिका नवीन मुख्यालयाच्या आरेखनाला पाच स्टार मानांकनांबरोबर एशिया पॅसिफिक प्रॉपर्टी पुरस्कार

पनवेल : ‘इंटरनॅशनल प्रापॅर्टी ॲण्ड ट्रॅव्हल'च्या वतीने थायलंड येथे नुकतीच आंतरराष्ट्रीय स्तरावरील आरेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ‘बेस्ट पब्लिक सर्व्हिसेस आर्कटिेक्चर इंडिया' या गटामध्ये ‘एशिया पॅसिफिक प्रॉपर्टी पुरस्कार'च्या वतीने सादर करण्यात आलेल्या पनवेल महापालिका नवीन मुख्यालयाच्या आरेखनाला पाच स्टार मानांकनांबरोबर ‘एशिया पॅसिफिक प्रॉपर्टी पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले आहे.

‘इंटरनॅशनल प्रापॅर्टी ॲण्ड ट्रॅव्हल'च्या वतीने दरवर्षी विविध देशांमध्ये आशिया खंडातील विविध देशातील लोकपयोगी सेवा देणाऱ्या वेगवेगळ्या इमारतींच्या आरेखनांची स्पर्धा आयोजित करण्यात येते. यावर्षीची स्पर्धा थायलंड येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत आशिया खंडातील विविध देशातील वास्तू विशारदांनी सहभाग घेऊन आपली आरेखने सादर केली होती. या स्पर्धेमध्ये ‘हितेन सेठी आर्किटेक्चर'च्या वतीने पनवेल महापालिकेच्या नवीनमुख्यालयाचे आरेखन सादर करण्यात आले होते. या आरेखनाला पाच स्टार मानांकनांबरोबर ‘एशिया पॅसिफिक प्रॉपर्टी पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले आहे.

‘एशिया पॅसिफिक प्रॉपर्टी पुरस्कार'मुळे पनवेल महापालिकेच्या नवीन मुख्यालय इमारतीला एक महत्व प्राप्त झाले आहे. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या दूरदर्शी विचारातून उभारण्यात येणारी पनवेल महापालिकेची नवी इमारत असा पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील एकमेव महापालिकेची इमारत आहे.

सहा मजली महापालिकेच्या या नवीन मुख्यालयामध्ये २२४ आसन क्षमतेचे एक मुख्य सभागृह, १ बहुद्देशिय हॉल, समिती सभागृह, टेरेसवर आर्ट गॅलरी असणार आहे. सदर इमारत जास्तीत जास्त टिकाऊ बनविण्यावरती ‘हितेन सेठी आर्कटिेक्चर'च्या वतीने भर देण्यात आला आहे.

दरम्यान, सदर पुरस्काराबद्दल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी मुख्यालयामध्ये हितेन सेठी यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. याप्रसंगी उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, एचएसए कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 नवी मुंबईचा पाणी पुरवठा सुरळीत