एखादी दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण?

पावसाळा आला तरी नवी मुंबई शहरातील खोदकामे सुरु

वाशी : पावसाळ्यात खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचून कुठली दुर्घटना घडू नये म्हणून पावसाळा पूर्वीच नवी मुंबई शहरातील सर्व खोदकामांना २५ मे तारखेची अंतिम मुदत देण्यात येते. मात्र, आता जून महिन्याची १३ तारीख उजाडली तरी नवी मुंबई शहरात सर्व ठिकाणी खोदकामे सुरुच आहेत. त्यामुळे पावसाळयात एखादी दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण?, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

नवी मुंबई शहरातील अनेक ठिकाणी चौकांच्या तसेच रस्त्यांच्या कॉक्रिटीकरणांची आणि गटारांची कामे सुरु आहेत. नव्याने रस्त्याच्या खोदकामाला नवी मुंबई महापालिकेने परवानगी देणे बंद केले असले तरी अत्यावश्यक कामे म्हणून खोदकामे करण्यात येत आहेत. त्याचबरोबर कुठे मलनिस्सारण वाहिन्या तर कुठे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने पाणी पुरवठा लाईन बदलण्याची कामे सुरु आहेत. या खोदकामांमुळे नागरिकांची डोकेदुखी संपताना दिसत नाही. खोदकामांमुळे नागरिकांना आणि विशेषतः पादचाऱ्यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. स्थापत्य विभागाने खोदकामे पावसाळ्यापूर्वी करावी म्हणून २५ मे तारीख अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, २५ मे तारीख उलटून देखील अजून सदर कामे पूर्ण झाली नाहीत. आधीच या कामांसाठी वाहतूक बदल तसेच ब्यारीगेट्‌स लावल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यात आता पावसाला कधीही सुरुवात होईल. त्यामुळे खोदलेल्या खड्ड्यात पाणी साचून एखादी  दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण?, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

नवी मुंबई शहरात सुरु असलेल्या चौक काँक्रिटीकरण कामातील ८८ चौकांचे काम पूर्ण होत आले असून, अवघ्या आठ ठिकाणी कामे सुरु आहेत. सदर कामे देखील लवकर पूर्ण केली जाणार असून, त्याठिकाणी वाहतुकीत अडथळा होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. - संजय देसाई, शहर अभियंता - नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२४ तासानंतर पाणी