७ हजार ते ८ हजार पेट्या दाखल

 एपीएमसी फळ बाजारात जुन्नर हापूस हंगामाला सुरुवात

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात जुन्नर हापूस आंब्याच्या मुख्य हंगामाला सुरुवात झाली आहे. एपीएमसी फळ बाजारात आता जुन्नर हापूस आंब्याची आवक वाढली असून, ७ हजार ते ८ हजार पेट्या जुन्नर हापूस आंब्याच्या दाखल होत आहेत. प्रति डझन ३५० ते ७०० रुपयांनी जुन्नर हापूस आंब्याची विक्री होत आहे. जून अखेरपर्यंत जुन्नर हापूस हंगाम सुरु राहील, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम संपताच जून महिन्यात जुन्नर हापूस आंब्याच्या हंगामाला सुरुवात होते.

एपीएमसी बाजारात सध्या कोकणातील हापूस हंगाम संपला असून, राज्याबाहेरील आंब्याची आवक सुरु झाली आहे. एपीएमसी फळ बाजारात केशर, निलम, तोतापुरी, बलसाड, आंबे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर जुन्नरचा हापूस बाजारात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. बाजारात हापूस आवक वाढण्यास सुरुवात झाली असून, १२ जून रोजी एपीएमसी फळ बाजारात ७ हजार ते ८ हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. यंदा अवकाळी पावसाने सर्व प्रकारच्या आंब्यांच्या उत्पादनाला फटका बसला आहे. यंदा जुन्नर हापूसचे ३५ ते ४० टक्के उत्पादन आहे. बाजारात जुन्नर हापूस प्रतिडझन ३५० ते ७०० रुपयांनी विक्री होत असून, जून अखेरपर्यंत हंगाम असेल, अशी माहिती व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एखादी दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण?