यशवंतराव चव्हाण सेंटरचे कृतज्ञता पुरस्कार २०२३ वितरण नवी मुंबईत संपन्न

"विचारांची बैठक महत्वाची" - दिलीप वळसे पाटील

नवी मुंबई :  भौतिक प्रगती करतानाच विचारांची बैठक महत्वाची असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी विधानसभा अध्यक्ष, माजी गृहमंत्री आणि विद्यमान आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी केले. १० जून रोजी नेरुळ येथील स्टर्लिंग महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या यशवंतराव चव्हाण सेंटर नवी मुंबई केंद्राच्या  पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हल्ली महात्मा गांधी, पं. नेहरु, इंदिराजी गांधी, राजीव गांधी यांंची नावे कशी पुसली जातील हे पाहण्याचे दिवस आले आहेत. राजकारणाचा स्तर खालावला असून ज्या प्रकारे टीव्हीवर बातम्या दाखवल्या जातात त्याचा ऊबग येऊ लागल्याने पाच मिनिटांतच टीव्ही बंद करावासा वाटतो अशा शब्दात वळसे-पाटील यांनी खंत व्यवत केली.  

   या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी विचारमंचावर यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले, नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड, सचिव डॉ अशोक पाटील, कोषाध्यक्ष भाऊसाहेब शिंगाडे उपस्थित होते. यशवंतराव चव्हाण यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येऊन चांगले राजकारण तर केलेच; पण पारतंत्र्यात असल्यापासून देशसेवेत व्यस्त राहिले आणि पं. जवाहरलाल नेहरु यांच्या निर्वाणानंतर तत्कालिन काँग्रेसी धुरीणांनी यशवंतराव यांनी देशाची धुरा सांभाळावी असे सांगितले असतानाही त्यांनी त्यावर निर्णय घेण्याची जबाबदारी इंदिराजींकडे देऊन चालून आलेल्या सर्वोच्च संधीपासूनही ते अलगद बाजूला झाले. अलिकडच्या शाळकरी मुला-मुलींना यशवंतराव कोण होते हे कदाचित सांगताही येणार नाही, या वास्तवाकडे अंगुलीनिर्देश करुन यशवंतराव सेंटरच्या यापुढील कार्यक्रमात त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे दालनही सुरु करा, जेणेकरुन प्रेक्षकांना ती पुस्तके उपलब्ध होतील अशी सुचनाही वळसे-पाटील यांनी यावेळी  केली. या प्रसंगी अस्मिता स्पेशल स्कूल, यशोदा महिला मंडळ, जिजामाता ट्रस्ट या सेवाभावी संस्था तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्य करणारे अण्णासाहेब टेकाळे, फार्मसी उद्योग गुणवत्ता तज्ञ रणजित बार्शीकर, नाट्य-सिने अभिनेते-दिग्दर्शक अशोक पालवे, स्पिरीच्युअल हिलिंग विशेषज्ञ डॉ. सुहास पाबळकर, दै. आपलं नवे शहरचे उपसंपादक आणि गेली चोवीस वर्षे मुशाफिरी ही लेखमाला चालवणारे राजेंद्र घरत, संपादक व सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू, शिक्षण क्षेत्रात बहुमोल कार्य करणाऱ्या सुरेखा पाटील यांनाही त्यांच्या लक्षवेधी योगदानाबद्दल सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.

या प्रसंगी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात प्रतिष्ठान कसे कार्य करीत आहे याची तपशीलवार माहिती दिली. नवी मुंबई केंद्राचे अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांनी प्रास्ताविकातून नवी मुंबईमधील उपक्रमांबद्दल सांगताना करोना काळातही केलेल्या कामांचा आढावा घेतला. सत्कारमूर्तींच्या वतीने अण्णासाहेब टेकाळे व डॉ. सुहास पाबळकर यांनी मनोगत व्यवत केले. डॉ. अशोक पाटील यांनी आभारप्रदर्शन केले. ठाणे येथील कलावंत श्रीप्रकाश सप्रे यांचा ‘सप्रेम नमस्कार' हा एकपात्री कार्यक्रम यावेळी पार पडला. अमरजा चव्हाण यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी नेटकेपणाने सांभाळली. सदर कार्यक्रमास नवी मुंबईमधील विविध संस्थांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

७ हजार ते ८ हजार पेट्या दाखल