‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार' प्रदान

 वृक्षप्रेमी आबा रणवरे यांचा ‘जीवनगौरव पुरस्कार'ने सन्मान

नवी मुंबई : यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक-बहुउद्देशीय संस्था अहिल्यानगर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार' नवी मुंबई मधील वृक्षप्रेमी आबा रणवरे यांना प्रदान करण्यात आला.

यशवंत सेना आणि जय मल्हार शैक्षणिक-बहुउद्देशीय संस्था अहिल्यानगर यांच्या वतीने दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय करणाऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ‘जीवनगौरव पुरस्कार' राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येतात. १० जून रोजी सावेडी-अहमदनगर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी
होळकर यांचा जयंती सोहळा आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृक्षसंवर्धन, संरक्षण-संगोपन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नवी मुंबईतील वृक्षप्रेमी आबा रणवरे यांना प्रा. डॉ. लक्ष्मणराव मतकर यांच्याहस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ‘जीवनगौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले.

मुंबईत ‘बेस्ट'मध्ये उत्कृष्ट विना अपघात बस चालक म्हणून आबा रणवरे यांना गौरवण्यात आले आहे. आपल्या बेस्ट मधील सेवेसह ते वृक्ष संवर्धनाचे काम तसेच पर्यावरण, वृक्ष लागवड आणि जतन करण्याचे कार्य करीत आहेत. बेस्ट सेवेतून सेवानिवृत्तीनंतर त्यांनी आपला संपूर्ण वेळ पर्यावरण आणि वृक्ष लागवड-संवर्धनाकडे दिला आहे. विविध क्षेत्रातील नागरिकांपासून शालेय विद्यार्थ्यांना आबा रणवरे पर्यावरण आणि वृक्ष लागवडी बाबत अधिक सविस्तर मार्गदर्शन करुन त्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याचे काम करीत
आहेत. रणवरे यांच्या सदर कार्याची दखल घेऊन यशवंत सेना आणि जय मल्हारशैक्षणिक-बहुउद्देशीय संस्थेनेे वृक्ष संवर्धन, संगोपन आणि वृक्ष संरक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनगौरव पुरस्कार' सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी ‘यशवंत सेना'चे शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर, कार्याध्यक्ष बाबासाहेब राशीनकर, सचिव निलम जाडकर आणि महिला अध्यक्ष ज्योती उनवणे आदि मान्यवर उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

यशवंतराव चव्हाण सेंटरचे कृतज्ञता पुरस्कार २०२३ वितरण नवी मुंबईत संपन्न