४ महिने उपचाराद्‌वारे एनआयसीयू मधील २ नवजात बालकांना जीवनदान

नेरुळ रुग्णालयातील वैद्यकीय समुहाची प्रशंसनीय कामगिरी

नवी मुंबई :  नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात सर्वसामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असल्याने या रुग्णालयांतून उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकडे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष आहे.  यामध्ये प्रसुती पूर्व आणि प्रसुती पश्चात आरोग्य सेवांकडेही विशेष लक्ष दिले जात आहे. यामधील एनआयसीयू एक अत्यंत महत्त्वाची सुविधा नवजात बालकांसाठी अतिशय महत्त्वाची ठरत आहे.

नेरुळ येथील महापालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयातील एनआयसीयू मध्ये जन्मल्यापासून फुपफुसे पुरेशा प्रमाणात विकसित नसलेली नेरुळ, सेक्टर-६ सारसोळे येथील रहिवासी सौ. सान्वी स्वप्नील मोहिते यांची जुळी बालके जीवनाशी तब्बल चार महिन्याची झुंज देत आता बरी होऊन घरी परतली आहेत. महापालिकेच्या माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेस यांनी केलेल्या सुयोग्य उपचारांबद्दल आणि अविश्रांत मेहनतीबद्दल मोहिते परिवाराच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानण्यात आले असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनीही रुग्णालयाच्या संपूर्ण वैद्यकीय समुहाचे अभिनंदन केले आहे.


सारसोळे येथील सान्वी स्वप्नील मोहिते यांची १० फेब्रुवारी २०२३ रोजी प्रसुती होऊन जुळी बालके जन्माला आली होती. सामान्यपणे ३४ आठवड्यात गर्भातील बाळांची फुपफुसे पूर्ण तयार होतात. पण, सान्वी यांची बाळे २६ आठवड्यांतच जन्माला आली. त्यामुळे त्यांच्या फुफुसांचा विकास पूर्णतः झाला नव्हता. अशा बाळांचा जीव वाचवणे वैद्यकीय समुहासाठी मोठी अशक्यप्राय गोष्ट असते. पण, नेरुळ रुग्णालयातील वैद्यकीय समुहाने सदरचे आव्हान पेलायचे ठरवले. रात्रीची डिलिव्हरी झालेली असताना जुळी बालके सकाळपर्यंतचा कालावधी काढतील का? अशी शंका असताना त्या बालकांनी जीवनाशी केलेला संघर्ष कमालीचा आहे. बाळांची फुपफुसे पूर्णतः तयार झालेली नसल्याने त्यांना व्हेंटिलेटरची गरज होती. महापालिकेच्या वैद्यकीय समुहाने त्यांना लगेच व्हेंटिलेटरवर घेऊन फुपफुसे बनण्यासाठीचे अतिशय महागडे असणारे सरफॅक्टन्ट इंजेक्शन एनआयसीयू मध्ये मोफत उपलब्ध करुन देत दोन्ही बाळांवर उपचाराला सुरुवात केली. या बाळांचा व्हेंटिलेटर ते सईपॅप ते रुम एअर असा प्रवास रुग्णालयातील डॉक्टरांसाठी एक आव्हान आणि थक्क करणारा अनुभव होता.

बाळ व्हेंटिलेटर मधून बाहेर पडल्यानंतरही त्याचे वजन वाढवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. यादृष्टीने एनआयसीयू मधील स्टाफ नर्सेसनी घेतलेली मेहनत अत्यंत वाखाणण्याजोगी आहे. त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आपल्या बाळांवर हे मोठे संकट कोसळलेले असताना बाळांच्या आईने सान्वी मोहिते यांनी जो संयम आणि ध्येय दाखवले तेही निश्चितच प्रशंसनीय आहे. तब्बल चार महिने स्वतःचा संयम न गमावता डॉक्टर करीत असलेल्या उपचारांवर विश्वास ठेवून या माऊलीने जो संघर्ष केला तो प्रेरणादायी आहे.
मागील चार महिने यासाठी अथक प्रयत्न करणारे माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उध्दव खिल्लारे तसेच डॉ. सुषमा तायडे, पिडियाट्रिक प्रा. डॉ. अशोक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वाची भूमिका बजावणारे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत भोसले, डॉ. सुरज घारे, डॉ. मनिषा शिंदे, डॉ. वैभव भगत, डॉ. राजेंद्र बोराडे, डॉ. नम्रता जगदाळे, डॉ. प्रशांत, डॉ. नेहल, डॉ. झानेश्वर मोरे, डॉ. राजकुमार सहानी त्याचप्रमाणे मेट्रन सिस्टर श्वेता वऱ्हाडे, एनआयसीयू प्रमुख सिस्टर शैला, सिस्टर जस्सी आणि सर्व एनआयसीयू स्टाफ यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालय, नेरुळ येथून गेल्या वर्षभरात एनआयसीयू मध्ये ४४९ बालकांवर उपचार करण्यात आले असून त्यामध्ये १ कि.ग्रॅ. पेक्षा कमी वजनाच्या १५ बालकांवर तसेच १ ते १.५ कि.ग्रॅ. वजनाच्या ५१ बालकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. नवी मुंबई महापालिका रुग्णालय सेवेसाठी सदरची गोष्ट अत्यंत अभिमानाची आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार' प्रदान