पनवेल महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष

 तळोजा वसाहत मधील बस थांब्यांवर निवारा शेड उभारण्याचा विसर

खारघर : ‘नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम'च्या (एनएमएमटी) बस सेवेला तळोजा वसाहत मधून महिन्याला एक कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होते. मात्र, तळोजा मधील प्रवाशांना बस थांब्यावर निवारा शेड नसल्यामुळे उन्हात उभे रहावे लागत आहे. त्यामुळे एनएमएमटी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गात नाराजी पसरली आहे.

तळोजा वसाहत मधील प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाला दरमहा जवळपास एक कोटी रुपये उत्पन्न मिळत असल्यामुळे नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाने तळोजा मार्गावर अधिक लक्ष केंदित करुन एनएमएमटी बस वाढ  केली आहे. तळोजा वसाहतीत घणसोली ते पेठाली गाव या मार्गावर ५५ क्रमांकाची  एनएमएमटी बस तर बेलापूर रेल्वे स्थानक ते तळोजा  मार्गावर ५२ क्रमांकाची एनएमएमटी बस तळोजा फेज एक मध्ये तर तळोजा फेज दोन मध्ये ४३, ४५, ५४ क्रमांकाच्या एनएमएमटी बस धावतात.

गेल्या पाच वर्षात तळोजा फेज-२ मध्ये सिडको तसेच अनेक खाजगी विकासकानी गृहप्रकल्प उभारणी सुरु केल्यामुळे आणि नवी मुंबई मेट्रो रेल्वे सुरु होणार असल्यामुळे अनेक नागरिक वास्तव्यास आले आहेत. तळोजा वसाहतीत प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. तळोजा मधील प्रवाशांकडून ‘एनएमएमटी'ला मासिक एक कोटी रुपये उत्पन्न मिळत असूनही तळोजा फेज-१ मधील तळोजा भुयारी मार्ग लगत असलेला बस थांबा, तळोजा सेक्टर-१०, सेक्टर-७  तसेच तळोजा फेज-२ मध्ये अनेक ठिकाणी एनएमएमटी बस थांबा आहे. मात्र, बस थांब्यावर निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्हातच उभे राहावे लागत आहे.

तळोजा फेज-२ मधील एनएमएमटी बस थांब्यावर निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना ऊन-पावसाळ्यात ताटकळत रस्त्यावर उभे राहावे लागत आहे. तळोजा फेज-२ मधील एनएमएमटी बस थांब्यावर काही कंपनीच्या निवारा शेड उभारणीसाठी परवानगी द्यावी, या मागणीचे पत्र ‘आदर्श सामाजिक संस्था' द्वारे पनवेल महापालिकेला पाठविण्यात आले होते. मात्र, त्या मागणीकडे पनवेल महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

तळोजा वसाहत पनवेल महापालिका हद्दीत आहे. त्यामुळे तळोजा वसाहत मधील बस थांब्यांवर निवारा शेडची व्यवस्था करण्याचे काम पनवेल महापालिकेचे आहे. तळोजा वसाहत मधील बस थांब्यांवर निवारा शेड उभारण्याचे काम नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमाचे नाही.- योगेश कडुसकर, व्यवस्थापक - नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रम.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

४ महिने उपचाराद्‌वारे एनआयसीयू मधील २ नवजात बालकांना जीवनदान