महापालिका आणि वाहतुक पोलीस विभागाने संयुक्तपणे नियोजन करण्याची सूचना

पावसाळ्यात वाहतूक कोंडी न होण्यासाठी उपाययोजना करण्याचे महापालिका आयुक्तांचे निर्देश

ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन बाहेरील रस्ता फेरीवाला मुक्त केल्यामुळे येथून नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला असल्याच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया विविध माध्यमातून येत आहेत. ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या समन्वयाने करण्यात आलेली कार्यवाही कायमस्वरुपी ठेवावी. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात देखील ठाणे शहरातील महत्वाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने उपाययोजना करुन तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत सर्व संबंधितांना दिले.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर वर्दळीच्या ठिकाणी देखील वाहतूक नियोजन होणे गरजेचे आहे. गावदेवी परिसर वर्दळीचे ठिकाण असून, वाहतूक आणि पादचारी यांचे परिचलन योग्यपध्दतीने व्हावे यासाठी तेथे सद्यस्थितीत लावण्यात आलेले पोलार्ड कायमस्वरुपी ठेवावे, पोलार्ड काढल्यास तेथून वाहतूक सुरु होवून पादचाऱ्यांना त्रासाचे ठरेल. सदर परिसरात पादचाऱ्यांना विशेषतः महिला वर्गाला ये-जा करताना गैरसोय होणार नाही या दृष्टीने वाहतूकीचे परिचालन करण्याबाबत महापालिका व वाहतूक विभागाने समन्वय साधून निर्णय घ्यावा, अशी सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठकीत दिली.

सेवा रस्त्यावर गाड्या उभ्या राहू नयेत याकरिता तीन हात नाका ते नितिन जंक्शन सेवा रस्त्यावर अनधिकृतपणे गाड्या उभ्या असतील तर त्यांच्यावर कारवाई करुन दंड आकारण्यात यावा, तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या शो रुमच्या गाड्या असतील तर त्यांना देखील सूचना देवून गाड्या रस्त्यावर उभ्या राहणार नाहीत, याबाबत दक्षता घेणेबाबत सूचित करावे. तसेच वागळे इस्टेट येथील पासपोर्ट कार्यालय येथे समांतर पार्किंग असून त्या ठिकाणी पी-१, पी -२ फलक लावावेत. तसेच गोखले रोड येथे देखील पी-१, पी -२ बोर्ड लावावेत, अशी सूचनाही महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी केली.


वाहतुक सुरळीत होण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याचे निर्देश
ठाणे शहरातील नागरीकरण झपाट्याने होत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. तसेच पूर्वद्रुतगती महामार्गावरुन बाहेरगावी जाणारी वाहने मोठ्या प्रमाणावर असल्याने सर्वच ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत आहे. ठाणे शहरामध्ये कोणत्याही ठिकाणी वाहतूक कोंडी होणार नाही या दृष्टीने वाहतूक नियंत्रण विभाग आणि महापालिकेने संयुक्तपणे कार्यवाही करुन वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करावेत तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन देखील नियुक्त करावेत, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.


आवश्यक ठिकाणी दुभाजक टाकण्याची सूचना
गोखले रोड येथील समर्थ भांडार, रहेजा परिसर, तीन पेट्रोलपंप, आराधना परिसर येथील रस्ता दुभाजक आणि खोपट, पलॉवर व्हॅलीकडून कॅडबरी जंवशनकडे येणाऱ्या सर्व्हिस रोडवर कर्व्ह दुभाजक टाकावेत. तसेच तात्पुरते डिव्हायडर देखील प्लॅस्टिकचे न ठेवता काँक्रिटचे ठेवावेत, तसेच दुभाजकामध्ये जागा राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचनाही बैठकीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली.

ठाणे शहरातील माजिवडा, मॉडेल नाका, तीन हात नाका,कळवा आदी जंक्शनवरुन मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते. त्यामुळे सदर ठिकाणी काँक्रिटीकरण पध्दतीने काम करणे गरजेचे आहे. तसेच सदर सर्व कामे पावसाळ्यापूर्वी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बैठकीत दिले.

स्पीड ब्रेकर बाबत ‘आयआरसी'च्या असलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ठाणे शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक कार्यकारी अभियत्यांनी आपापल्या विभागात ड्राईव्ह घेवून जे स्पीडब्रेकर आयआरसीच्या नॉर्मनुसार नाहीत त्याची यादी करावी. रबराचे स्पीड ब्रेकर काढून टाकावेत. ज्या ठिकाणी तात्पुरते स्पीडब्रेकर बसवायचे असतील तर ते देखील आयआरसीच्या नॉर्मनुसार बसवावेत, तसेच ठाणे शहरातील सर्व स्पीडब्रेकर आयआरसीच्या नॉर्मनुसार असतील याची सर्वांनी दक्षता घ्यावी, अशा सूचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी संबंधिताना बैठकीत दिल्या आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष