शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
मोरबे धरणाची जलवाहिनी फुटली
नवी मुंबई शहरात दिवसभर पाणी संकट
वाशी : नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणावरील मुख्य जलवाहिनी आदई गावाजवळ १० जून सकाळी फुटल्याची घटना घडली. यावेळी महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या वतीने फुटलेली जलवाहिनी दुरुस्ती कामाला तत्काळ सुरुवात करण्यात आली. पण, पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आल्याने नवी मुंबई शहरात दिवसभर पाणी संकट जाणवले. तसेच सदर काम पूर्ण होण्यासाठी किमान १४ तास लागणार असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच याच वाहिनीवरील देखभाल-दुरुस्तीसाठी दिवसभर पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता.
नवी मुंबई महापालिकेच्या भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र आणि मुख्य जलवाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीचे काम ७ जून रोजी करण्यात आले होते. यामुळे एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येत होता. यानंतर ९ जून पासून पाणी पुरवठा पूर्ववत झाला असताना १० जून रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आदई गावाजवळ मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे जलवाहिनीवरील पाणी पुरवठा बंद करुन तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
२०२४ मि. मि. व्यासाची जलवाहिनी फुटली असल्यामुळे दुरुस्ती कामासाठी वेळ लागणार आहे. जवळपास १४ तास दुरुस्तीचे काम सुरू राहणार असल्याची माहिती महापालिका कडून देण्यात आली. रात्री १२ ते १ वाजता काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. परिणामी, या जलवाहिनीवर अवलंबून असणाऱ्या नवी मुंबई, खारघर आणि कामोठे परिसरामध्ये सायंकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करुन पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, आधीच नवी मुंबई शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत असताना आता जलवहिनी फुटल्याने पाणी बंद राहिले. त्यामुळे स्वतःचे धरण असून देखील नवी मुंबईकरांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.