सिडको उलवे गृहप्रकल्पातील बांधकाम मजुरांना १५०० मच्छरदाणींचे वाटप

आरोग्य संचालनालयाची #Zero Malaria Starts With Me मोहीम

नवी मुंबई : पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या मलेरिया मुवत अभियान अंतर्गत आरोग्य सेवा संचालनालयाचे सहाय्यक संचालक डॉ. बाळासाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली #Zero Malaria Starts With Me (शून्य मलेरिया माझ्यापासून सुरु होतो) मोहीम उलवे नोड मधील बामणडोंगरी विभागात ८ जून रोजी राबविण्यात आली. हार्ट फाऊंडेशन आणि एल ॲन्ड टी यांच्या सहकार्याने तसेच जिल्हा हिवताप अधिकारी-रायगड जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या सदर उपक्रमात जवळपास १५०० हुन अधिक मच्छरदाण्यांचे सिडको गृहप्रकल्पातील बांधकाम मजुरांना वाटप करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा हिंवताप अधिकारी डॉ. राजाराम भोसले, हार्ट फाऊंडेशनचे डॉ. जयकर एलिस, सिडको एल ॲन्ड टी उलवे प्रकल्पाचे प्रभारी व्यवस्थापक सी. जे. परमार, आदिंसह इतर मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य सेवा संचालनालयाचे सहाय्यक संचालक डॉ. बाळासाहेब सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मजूर कामगार बांधवांना १५०० हुन अधिक मच्छरदाण्यांचे वाटप केले. तसेच आजुबाजुचा परिसर स्वच्छ ठेवतानाचा डासांपासून स्वतःचा बचाव करण्याच्या अनुषंगाने या मजुरांना आरोग्य शिक्षण देण्यात आले, असे डॉ. राजाराम भोसले यांनी सांगितले.

जसाजसा पावसाळा जवळ येत आहे, तसे आम्ही हार्ट फाउंडेशनची टीम आणि आमच्या आरोग्य कर्मचारी यांच्या मदतीने शाळा, सोसायटी, संस्था आणि विविध भागात जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यास सुरुवात केली आहे. तळागाळातील जीवनाला स्पर्श करण्याची आमची नेहमीच इच्छा राहिली आहे. त्यामुळेच अशा अनोख्या कार्यक्रमाचा भाग झाल्याचा आम्हाला आनंद आहे. गेल्या वर्षी आम्ही २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून मलेरिया बाबत जनजागृती केली. तसेच ३०० पेक्षा जास्त बॅक लाईट डिस्प्ले बोर्ड लावू शकलो, असे डॉ. जयकर एलिस म्हणाले.

आरोग्य सेवा संचालनालयाने आमच्या कामगारांना सदर मच्छरदाण्यांचे वाटप केल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. आम्ही वेगवेगळ्या भागात ३ बॅकलाईट डिस्प्ले बोर्ड लावले आहेत, जेणेकरुन आमच्या कामगारांना आरोग्य शिक्षण मिळेल. तसेच #Zero Malaria Starts With Me अंतर्गत काय करावे आणि काय नये याबाबत माहिती सादर केली आहे. एकंदरीतच आम्ही मलेरिया मुक्त भारत बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमात मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊ, असे एल ॲन्ड टी उलवे प्रकल्पाचे प्रभारी व्यवस्थापक परमार यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मोरबे धरणाची जलवाहिनी फुटली