घाऊक बाजारात लसूण दरात २० ते ३० रुपयांनी वाढ

प्रतिकिलो लसूण दर ११० ते १५० रुपयांवर

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मार्केटमध्ये लसूण, कांदा यांच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यापासून लसूण, कांदा आवक घटत असून, लसूण, कांदा यांचे भाव वधारले आहेत. एपीएमसी बाजारात आधी लसूण प्रतिकिलो ९० ते १२० रुपयांनी उपलब्ध होती. आता प्रतिकिलो लसूण दर ११० ते १५० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे महिलांची जेवणातील फोडणी चांगलीच महागली आहे.

एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यामध्ये नवीन ओल्या लसणाची आवक होण्यास सुरुवात होत असते. त्यामुळे नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येतात. मात्र, यंदा लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी असल्याने लसूण उत्पादन कमी आहे. त्यामुळे लसूण महागली आहे. एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, इंदोर येथून लसूण आवक होत असते. मात्र, यंदा लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी असून, त्यात अवकाळी पावसाने लसूण उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात लसणाची कमी आवक होत आहे. जानेवारी-फेब्रुवारी मध्ये २०-२५ गाड्या लसूण आवक होती. एप्रिल पासून लसूण आवक कमी होत आहे. ९ जून रोजी एपीएमसी बाजारात अवघ्या १२ गाड्यांमधून २५८३ गोणी लसूण दाखल झाला आहे. मागील आठवड्यात  घाऊक बाजारात ९० ते १२० रुपयांपर्यंत उपलब्ध असणाऱ्या लसूण दरात २० ते ३० रुपयांनी दरवाढ झाली असून, आता प्रतिकिलो ११० ते १५० रुपयांवर लसूण दर गेले आहेत. सुरुवातीला लसूण दर आवाक्यात होते. त्यामुळे गृहिणीनी समाधान व्यक्त केले होते. मात्र, पुन्हा लसूण दर वाढल्याने गृहिणींकरिता लसूण फोडणी महागली आहे. सन-२०१७ मध्ये लसूण दराने उच्चांक गाठला होता. प्रतिकिलो लसणाचे दर २०० ते २५० रुपयांवर गेले होते. यंदाही पुढील कालावधीत लसूण २०० रुपये पार करेल, अशी शक्यता एपीएमसी बाजारातील व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.


यंदा लसूण लागवडीखालील क्षेत्र कमी  असून, अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे लसणाची आवक घटल्याने लसूण दरात वाढ होत आहे. परिस्थिती अशीच राहिली तर पुढील कालावधीत लसणाचे दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. - मनोहर तोतलानी, व्यापारी - कांदा-बटाटा बाजार, एपीएमसी. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘बल्लाळेश्वर सहकारी पतपेढी'ची रौप्य महोत्सवी वाटचाल