उद्यान खुले करण्यास विलंब; संरक्षण भिंत ओलांडून उद्यानात प्रवेश

तळोजा वसाहत मधील प्रकार

खारघर ः तळोजा सेक्टर-९ मधील उद्यानाचे टाळे माळी कामगारांकडून वेळेवर खुले केले जात नाही. त्यामुळे सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या वयोवृध्द नागरिक आणि महिलांना अडगळ जागेतील संरक्षण भिंत ओलांडून उद्यानात प्रवेश करावा लागत आहे. याबाबत पनवेल महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

‘सिडको'ने तळोजा वसाहत निर्माण करताना काही सेक्टर मध्ये उद्यान तर काही सेक्टर मध्ये मैदान विकसित केले आहे. तळोजा वसाहत सेक्टर-९, प्लॉट नंबर-६ मधील उद्यानात खुले व्यायामाचे साहित्य बसविण्यात आले असून, पदपथांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे महिला, मुले-मुली आणि ज्येष्ठ नागरिक सदर उद्यानाला अधिक पसंती देत आहेत. सदर उद्यान खुले राहण्याची वेळ सकाळी ६ ते ९ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ अशी आहे. उद्यानाची देखरेख आणि झाडांना पाणी देण्यासाठी पनवेल महापालिकेने माळी  कामगारांची नेमणूक केली आहे. विशेष म्हणजे सकाळच्या वेळेत मॉर्निंग वॉकसाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. वेळेपूर्वी उद्यानाचे टाळे खुले करणे आवश्यक असते. मात्र, माळी कामगारांवर महापालिकेचे नियंत्रण नसल्यामुळे ते वेळेवर येत नाहीत. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि मुले-मुली यांना अडगळ जागेत मोडकळीस आलेल्या संरक्षण भिंत आणि संरक्षण जाळी पार करुन उद्यानात प्रवेश करावा लागत आहे. उद्यानात प्रवेश करताना ज्येष्ठ नागरिकांचे किरकोळ अपघात होण्याचे प्रकार देखील घडले आहेत. एक रिक्षा चालक कधी सहा तर कधी सात नंतर येवून टाळे उघडत असतो, असे उद्यानात येणाऱ्या नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे तळोजा वसाहत पनवेल महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आली आहे. महापालिकेचे प्रभाग कार्यालय खारघर मध्ये आहे. तसेच प्रभाग कार्यालयातील दूरध्वनी बंद असल्यामूळे संपर्क साधता येत नाही, असे नागरिकांनी सांगितले. महापालिकेने नव्याने माळी कामगारांची नेमणूक करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या विषयी महापालिकेचे उद्यान अधिकारी राजेश कर्डीले यांच्याशी संपर्क केला असता होवू शकला नाही.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घाऊक बाजारात लसूण दरात २० ते ३० रुपयांनी वाढ