आयुक्त नार्वेकर यांची विविध सेवटर्स मध्ये चालत जाऊन स्वच्छता कार्याची पाहणी

महापालिका आयुक्तांची ऑन द स्पॉट स्वच्छता पाहणी

नवी मुंबई :  शहर स्वच्छतेकडे संबंधित सर्व घटकांनी काटेकोर लक्ष द्यावे असे आढावा बैठकीत निर्देशित करतानाच नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विविध भागांना प्रत्यक्ष भेटी देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसात ८ जून रोजी त्यांनी शिरवणे मार्केट पासून सुरुवात करीत कोपरखैरणे-घणसोली नाल्यापर्यंत विविध भागांमधील स्वच्छता स्थितीची ऑन द स्पॉट जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

दरम्यान, या भेटी दरम्यान कोपरखैरणे-घणसोली नाल्याची सफाई समाधानकारक झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने तसेच नाल्याच्या प्रवाहात आणि काठावर मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक आढळल्याने तेथील स्वच्छता अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिले.

सदर पाहणी दौऱ्यात आयुक्तांसमवेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुवत डॉ. बाबासाहेब राजळे, नगररचना विभागाच सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आयुक्त नार्वेकर यांनी नेरुळ, शिरवणे, जुईनगर, सानपाडा, तुर्भे, एपीएमसी, वाशी तसेच कोपरखैरणे विभागातील विविध सेक्टर्स, वाणिज्य भाग यामधील स्वच्छता स्थितीची पाहणी केली. ‘स्वच्छ सर्वेक्षण'च्या अनुषंगाने सर्व सोसायट्यांच्या बॅकलेन कायम स्वच्छ राहतील, याकडे विशेष लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले.

दररोज १०० किलो पेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या सोसायट्या, संस्था यांनी ओल्या कचऱ्यावर त्यांच्याच आवारात प्रक्रिया करुन विल्हेवाट लावावी यादृष्टीने सजग राहण्याचे निर्देश आयुक्तांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले. या प्रकल्पांची केवळ सुरुवात करुन भागणार नाही तर ते नियमित कार्यान्वित राहतील याबाबतही काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. वाशी, सेक्टर-२९ येथील प्रेसिडेंट पार्क तसेच कोपरखैरणे, सेक्टर-१४ येथील ब्रेव्हर्ली पार्क या सोसायट्या घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण असून त्याठिकाणच्या प्रक्रियेची आयुक्तांनी पाहणी केली.

विविध सेक्टर्स मधील अंतर्गत भागात आयुक्तांनी चालत जाऊन स्वच्छता कार्याची पाहणी केली. पदपथ, रस्त्यांची सफाई करताना रस्त्यांच्या कडेला ठिकठिकाणी लावलेल्या लीटर बीन्सची सफाई करावी. तसेच लीटर बीन्स नादुरुस्त असल्यास किंवा लावलेल्या जागेवर नसल्यास त्याची माहिती त्वरित आपल्या विभागाच्या अभियंत्यांना द्यावी आणि लीटर बिन्स बसवून घ्यावीत, असेही आयुक्त नार्वेकर यांनी स्वच्छता निरीक्षकांना निर्देशित केले. तसेच ब्लू डायमंड हॉटेल, कोपरखैरणे समोरील सार्वजनिक शौचालय पाणी नसल्याने बंद आढळल्याने संबधितांना जाब विचारत कोणतेही शौचालय नागरिकांना वापरता येणार नाही अशाप्रकारे बंद ठेवलेले आढळल्यास संबंधितांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे स्पष्ट करीत आयुक्तांनी सदर ठिकाणच्या केअर टेकरकडून होत असलेला कंटेनरचा निवासी वापर तात्काळ बंद करण्याचे निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी विभाग अधिकाऱ्यांना दिले.

कुठेही, कशाही प्रकारे लागलेल्या होर्डींगमुळे शहराचे विद्रुपीकरण होते. सदर गोष्ट गांभिर्याने घेऊन होर्डींगविरोधी मोहिमा तीव्रपणे राबवाव्यात. वाणिज्य संकुल भागात अतिक्रमण नसावे याबाबत यापूर्वीच दिलेल्या सुचनांची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने या बाबीकडे गंभीरपणे विशेष लक्ष देण्यात यावे. नागरिकांकडून विविध माध्यमांतून आणि प्रसारमाध्यमांतून आपल्यापर्यंत पोहोचणाऱ्या स्वच्छतेबाबतच्या तक्रारी याकडे सकारात्मकतेने लक्ष द्यावे. त्या शहराच्या स्वच्छता सुधारणेसाठी महत्वाच्या आहेत. तक्रारींचे तत्परतेने निवारण करावे. नवी मुंबईकर नागरिकांच्या स्वच्छता कार्यातील सहभाग वाढीवर भर द्यावा. - राजेश नार्वेकर, आयुक्त - नवी मुंबई महापालिका.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उद्यान खुले करण्यास विलंब; संरक्षण भिंत ओलांडून उद्यानात प्रवेश