स्वच्छता मधील सातत्य टिकवून ठेवण्याचे आयुवत राजेश नार्वेकर यांचे रहिवाशांना आवाहन

‘एनआरआय'मधील घनकचरा प्रकल्पाची महापालिका आयुवतांकडून पाहणी

नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण'मध्ये घरातूनच ओला, सुका आणि घरगुती घातक अशा तीन प्रकारे कचरा वर्गीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दररोज १०० मेट्रीक टनाहून अधिक कचरा निर्माण करणाऱ्या मोठ्या संस्था, सोसायट्या, हॉटेल्स यांनी ओल्या कचऱ्यावर आपल्याच आवारात प्रक्रिया करणे घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार आवश्यक असून त्याकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.

‘स्वच्छ सर्वेक्षण'मध्ये नवी मुंबई महापालिका नेहमीच आघाडीवर राहिली असून यामध्ये स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांच्या सक्रिय सहभागाचा मोठा वाटा राहिला आहे. यावर्षीही ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०२३'ला सामोरे जात असताना निश्चय केला-नंबर पहिला असे आपले ध्येयवाक्य नजरेसमोर ठेवून वाटचाल सुरु आहे.

या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यामार्फत स्वच्छता कार्यवाहीकडे विशेष लक्ष दिले जात असून नुकतीच त्यांनी स्वच्छतावषयक आढावा बैठक घेऊन प्रत्येक घटकाने स्वच्छता मोहिमेला अधिक वेग देण्याचे निर्देश दिले होते. यादृष्टीने प्रत्येक विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच विभागनिहाय नियुक्त विभागप्रमुख दर्जाचे नोडल अधिकारी यांनी आपापल्या क्षेत्राचा नियमित पाहणी दौरा करुन स्वच्छतेमध्ये जाणवणाऱ्या त्रुटी संबंधितांच्या निदर्शनास आणून देऊन त्याचे त्वरित निराकरण करण्याबाबत सूचना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिल्या होत्या.

यासोबतच स्वतः आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यामार्फतही विविध विभागांतील स्वच्छतेची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे. यानुसार त्यांनी ‘स्वच्छ सर्वेक्षण'च्या सिटी प्रोफाईलमध्ये असलेल्या मोठ्या प्रमाणावर कचरा निर्मिती होणाऱ्या (बी.डब्ल्यू.जी.) एनआरआय कॉम्प्लेक्स फेज-२ मधील सीवुडस्‌ इस्टेट सोसायटीला अचानक भेट देत तेथील कचरा विल्हेवाट प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, बेलापूर विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी शशिकांत तांडेल, मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनावणे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

एनआरआय कॉम्प्लेक्स नवी मुंबई क्षेत्रातील अतिशय मोठी सोसायटी असून येथील फेज-२ मध्ये ५०० कि.ग्रॅ. क्षमतेची कंपोस्ट पीटस्‌ बनविण्यात आली आहेत. सोसायटी मधून दररोज संकलित होणारा ओला कचरा पीटस्‌मध्ये टाकला जात असून त्यापासून खत निर्मिती करण्यात येत आहे. दररोजच्या सरासरी ४०० कि.ग्रॅ. ओल्या कचऱ्यापासून निर्माण होणारे खत सोसायटीच्या आवारातील उद्यान आणि हिरवाई विकसित करण्यासाठी वापरले जात असून त्यामुळे कचऱ्याची निर्मितीच्या ठिकाणी विल्हेवाट लावली जाते. परिणामी, कचरा वाहतूक खर्चात बचत होते.

सदर ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून होणाऱ्या खत निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया आयुक्त राजेश नार्वेकर यांनी समजून घेतली. सोसायटीमध्ये दैनंदिन निर्माण होणाऱ्या ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे तपशील तपासले. त्याचप्रमाणे सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधत कचरा वर्गीकरण आणि कच-याची विल्हेवाट सोसायटीच्या आवारातच लावण्याचे अत्यंत चांगले काम आपण करीत आहात, याबद्दल प्रशंसा केली. स्वच्छता नियमित करण्याची गोष्ट असल्याने त्यातील सातत्य आपण असेच टिकवून ठेवावे, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी रहिवाशांना केले.

पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने पूर्ण झालेल्या नैसर्गिक नालेसफाई आणि बंदिस्त गटारे सफाई यांचीही पाहणी आयुक्त राजेश नार्वेकर करणार असून स्वच्छताविषयक कामांकडेही स्वतः बारकाईने लक्ष देत आहेत. याद्वारे नवी मुंबईतील स्वच्छता कामांना अधिक गती प्राप्त झालेली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 हृदयाला छिद्र असलेल्या मुलीला जीवनदान