‘महावितरण'चा वर्धापन दिन वाशी मंडळ तर्फे उत्साहात साजरा

सांस्कृतिक कार्यक्रमामुळे कर्मचाऱ्यांना जोमाने काम करण्याची ऊर्जा -चंद्रकांत डांगे

नवी मुंबई :‘महावितरण'चा १८ वा वर्धापन दिन वाशी मंडळ तर्फे ६ जून रोजी दिमाखात साजरा करण्यात आला. ३५० वा शिवराज्याभिषेक दिन आणि वर्धापन दिन असा दुग्धशर्करा योग साधून ‘महावितरण'च्या वाशी मंडळच्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी खास मनोरंजनाचा कार्यक्रम गुजरात भवन येथे आयोजित केला होता. याप्रसंगी ‘महावितरण'चे कोकण प्रादेशिक विभागाचे सह-व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे, भांडूप परिमंडळचे मुख्य अभियंता सुनील काकडे, सहाय्यक महाव्यवस्थापक (वि.व.ले.) प्रवीण रहांगदळे, सहाय्यक महाव्यवस्थापक (मासं) सौ. हविषा जगताप, वाशी विभाग कार्यकारी अभियंता श्यामकांत बोरसे, पनवेल विभाग कार्यकारी अभियंता सतीश सरोदे, चाचणी विभाग कार्यकारी अभियंता जगदीश बोडके तसेच सर्व उपविभागांचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आणि संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 कार्यक्रमात कोकण प्रादेशिक विभागाचे सह-व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी ‘महावितरण'च्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देत सर्व कर्मचारी-अधिकारी अतिशय जबाबदारीने आणि जोखीमीने काम करत असल्याद्दल त्यांचे कौतुक केले. तसेच वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामुळे कर्मचाऱ्यांना जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यवत केला.

थोर इतिहासकार, मोडीलिपी अभ्यासक आणि रायगड येथील ‘शिवराज्याभिषेक सोहळा समिती'चे सदस्य पंकज भोसले यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर रचलेले कविराज भूषण यांचे विरसरसातील काव्य अतिशय सुंदर स्वरुपात सादर करुन वातावरण रोमांचित केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची महती जनसमुदायापर्यंत पोहोचवली.

यावेळी वाशी मंडळातील अधिकारी-कर्मचारी यांनी विविध कलागुणांचे गायन, नृत्य, मूकनाट्य आणि एकांकिका या माध्यमातून सादरीकरण केले. सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते झी-टिव्ही वरील सारेगमप लिटिल चॅम्पस्‌ मधून प्रकाशझोतात आलेली विजेती ज्ञानेश्वरी गाडगे हिची गाण्यांची मैफल. या मैफिलीत ज्ञानेश्वरी गाडगे हिने विविध शैलीतील गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

दरम्यान, वाशी मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुतेज म्हात्रे, सौ.शर्वरी पाटील आणि सानिका राजगुडे यांनी केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पडलेले झाड उचलण्याचा उद्यान विभागाला विसर