एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त करण्याची पणन विभागाची तयारी

एपीएमसी संचालकांच्या सुनावणीला तीन आठवड्यांची प्रतीक्षा

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) संचालक मंडळाचा कोरम पूर्ण होत नसल्याचे कारण देत एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त करण्याची तयारी पणन विभागाने केली आहे. त्यासाठी एपीएमसी संचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, या निर्णयास नागपूर येथील एपीएमसी संचालक सुधीर कोठारी यांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यास  न्यायालयाने पुढील सुनावणी होईपर्यंत म्हणजेच ६ जून पर्यंत स्थगिती दिली होती. परंतु, ६ जून २०२३ रोजी होणारी सुनावणी आणखी ३ आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे.


एपीएमसी संचालक मंडळाचा कोरम पूर्ण होत नसल्याने एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक का नेमु नये?, याबाबत उर्वरित ८ एपीएमसी संचालकांना राज्य पणन विभागाने करणे दाखवा नोटीस बजावली होती. याबाबत ११ मे २०२३ रोजी सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र, एपीएमसी संचालक मंडळ बरखास्त करण्यास एपीएमसी संचालकांनी विरोध केला असून, नागपूर येथील एपीएमसी संचालक सुधीर कोठारी यांनी पणन विभागाच्या या निर्णय प्रक्रियेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने ६ जून रोजी सुनावणी होईपर्यंत पणन विभागाच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र, ६ जून रोजी होणारी सुनावणी ३ आठवड्यांनी घेण्यात येणार आहे. त्यामुळे एपीएमसी संचालक मंडळाचा निर्णय आणखी लांबला आहे. एपीएमसी आवारातील अत्यावश्यक सेवा अंतर्गत नालेसफाईला पणन विभागाने हिरवा कंदील दिला असला तरी, उर्वरित धोरणात्मक निर्णय एपीएमसी संचालक मंडळाच्या अभावी ठप्प आहेत. त्यामुळे एपीएमसी संचालक मंडळाचा निर्णय लवकरात लवकर लागणे ‘एपीएमसी' आवारातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२०२४ मध्ये नवी मुंबईमधून विमानोड्डाण