आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

समूह पुनर्विकास योजनेतून घरांची चावी मिळेल तो दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

१५०० हेक्टर जागेवर टप्प्याटप्प्यात योजना

सर्वात मोठा, ऐतिहासिक प्रकल्प

ठाणे :  ठाणे शहरातील समूह पुनर्विकास योजनेचे (क्लस्टर) काम सुरु करणे माझे स्वप्न आहे. सुमारे १५०० हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात क्लस्टर प्रकल्प उभारण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सुमारे १० हजार घरांची निर्मिती होणार आहे. क्लस्टर एक ऐतिहासिक प्रकल्प होणार आहे. ज्या दिवशी या योजनेतील घराची चावी नागरिकांना मिळेल तो दिवस माझ्यासाठी सर्वात परमोच्च आनंदाचा दिवस असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे केले.

अनधिकृत आणि अधिकृत धोकादायक इमारतींचा पुर्नविकास करण्यासाठी आखलेल्या ठाणे शहरातील समूह विकास योजनेच्या (क्लस्टर) कामाचा शुभारंभ ५ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री यांच्या सुविध पत्नी सौ. लता शिंदे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री ना. रविंद्र चव्हाण, कृषीमंत्री ना. अब्दुल सत्तार, खासदार कुमार केतकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, माजी आमदार रविंद्र फाटक, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर आदी उपस्थित होते. किसन नगर येथील समूह विकास योजनेच्या कामांची सुरुवात १९९७ मध्ये पडलेल्या साईराज इमारतींतील रहिवासी दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करुन करण्यात आली. यावेळी क्लस्टर योजनेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

१९९७ मध्ये ठाणे शहरातील साईराज इमारत पडल्यानंतर अनधिकृतधोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अनधिकृत इमारती या गरजेपोटी बांधल्या होत्या. घरे अनधिकृत असली तरी माणसे तर अधिकृत होती. त्यामुळे या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तेव्हापासून अनेक आंदोलने, संघर्ष केले. आज कित्येक वर्षानंतर क्लस्टर योजनेचे काम सुरु होत आहे. क्लस्टर योजना मार्गी लागण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. ठाणे शहरातील क्लस्टर योजनेचे काम आता सुरु झाले असून, इमारती पूर्ण होईपर्यंत ते काम सुरु राहणार आहे. या योजनेत केवळ इमारती उभ्या राहणार नाहीत, तर येथे मोकळी मैदाने, उद्याने, आरोग्याच्या सुविधाही असतील. एक सुनियोजित शहर उभारण्याचे आपले स्वप्न आहे. सिडकोद्वारे बांधण्यात येणाऱ्या घरांच्या दर्जापेक्षाही चांगल्या गुणवत्तेची घरे येथे उभारण्यात येतील. अधिकृत इमारती आणि सध्या सुरु असलेल्या पुनर्विकास योजनेतील इमारतींना क्लस्टर योजनेत समावेश ऐच्छिक ठेवला असून, यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

ठाणे शहराप्रमाणेच मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मीरा भाईंदर, कल्याण, भिवंडी आदी क्षेत्रातील अनधिकृत धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजनेचा मार्ग मोकळा केला आहे. मीरा भाईंदर मधील क्लस्टर योजना दिवाळीनंतर सुरु होईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.

मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक तेथे नियमात बदल करुन आता पुनर्विकास प्रकल्प शासनामार्फत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, महाप्रित, एसआरए आणि अन्य सर्व गृहनिर्माण संस्थांची मदत घेऊन पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्यात येतील. राज्य शासन सर्वसामान्यांचे सरकार आहे. गेल्या अकरा महिन्याच्या काळात सर्वसामान्यांसाठीच निर्णय घेण्यात आले आहेत. थांबलेल्या प्रकल्पाना राज्य सरकारने चालना दिली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार असल्यापासून ठाणे शहरातील क्लस्टर योजनेचा संघर्ष पाहिलेला आहे. क्लस्टर योजना सुरु होईल की नाही, याविषयी शंका होती. मात्र, आता क्लस्टर योजना प्रत्यक्षात सुरु होत असल्याचा आनंद आहे. पूर्वी ठाणे शहराला खेडेगाव समजत होते. मात्र, आता क्लस्टर योजनेमुळे ठाणे शहराला मुंबई शहराचा दर्जा मिळेल, असे यावेळी खा. वुÀमार केतकर म्हणाले.

मुंबई महानगर प्रदेश मोठ्या वेगाने वाढत आहे. येथील नागरिकांना चांगल्या सुखसोई देण्याचे काम विद्यमान राज्य शासनाच्या काळात होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या क्लस्टर योजनेला चालना देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ठाणे मधील विविध भागातही क्लस्टर योजना राबविण्याची गरज आहे. मिनी क्लस्टर योजनेची अनेक भागात गरज असून, शासनाने यावर विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मनोगत यावेळी आमदार संजय केळकर यांनी व्यवत केले.

यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रास्ताविकात क्लस्टर योजनेची माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे शहरातील नागरिक ज्याची वाट पाहत आहेत, तो क्लस्टर योजनेच्या कामांची सुरुवात होण्याचा दिवस आज आला आहे. आज ठाणेकरांच्या भाग्याचा दिवस आहे. ठाणे शहरात शौचालये दुरुस्ती, सौंदर्यीकरण, रस्ते विकासाची अनेक कामे सुरु आहेत. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे उपक्रमातून ठाणे शहराचा चेहरा बदलत आहे, असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी सांगितले

यावेळी ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना जमिनीची ताबा पत्रे देण्यात आली तर ‘महाप्रित'चे बिपीन श्रीमाळी यांना करारनामा पत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय वलस्टर योजनेसाठी सहकार्य करणाऱ्या ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रँक्टर, संजय देशमुख, विशेष सल्लागार मंगेश देसाई यांच्यासह जमिन मालकांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अनधिकृत आणि अधिकृत धोकादायक इमारतींचा सामूहिक पुर्नविकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या कामाची सुरुवात अंतिम भूखंड क्रमांक-१८६/१८७ या वरील ७७५३ चौ.मी. क्षेत्रफळावरील भूखंडावर तसेच रस्ता क्रमांक-२२ लगतचा भूखंड क्रमांक एफ -३ या ठिकाणी १९२७५ चौ.मी. एवढ्या जागेवर करण्यात येणार आहे. नागरी पुनरुत्थान १ आणि २ योजनेची अंमलबजावणी ‘सिडको'मार्फत होणार आहे. त्याचप्रमाणे समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या प्रशस्त कार्यालयाचे उद्‌घाटनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘माझी वसुंधरा अभियान'मध्ये क-वर्ग महापालिकांमध्ये नवी मुंबई राज्यात प्रथम