सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अनिल डिग्गीकर रूजू

डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडून स्वीकारली उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे

नवी मुंबई :  सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदाची सूत्रे अनिल डिग्गीकर यांनी 5 जून 2023 रोजी डॉ. संजय मुखर्जी यांच्याकडून स्वीकारली. सिडकोचे नोंदणीकृत कार्यालय असलेल्या मुंबईतील ‘निर्मल’ येथे अनिल डिग्गीकर यांनी उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली. तसेच याप्रसंगी सिडकोच्या सह-व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती झालेल्या शंतनु गोयल यांनीही आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली.

व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर हे 1990 च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. डिग्गीकर स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील (Civil Engineering) पदवीधर असून बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) येथून सार्वजनिक धोरण व व्यवस्थापनासाठी परिणामात्मक पद्धती व परिचालन संशोधन या विषयात व्यावसायिक शिक्षण घेतले आहे. त्याचबरोबर नवी दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड मधून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, पाचगणी
येथील सेंटर फॉर गव्हर्नन्स येथून सार्वजनिक प्रशासनातील नीतिशास्त्र,इंदोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मधून नेतृत्व विकास कार्यक्रम अशा विषयांवर प्रगत अभ्यासक्रम पूर्ण करून शिक्षण घेतले आहे.

अनिल डिग्गीकर यांनी 1990 मध्ये रत्नागिरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक कार्यकारी पदे भूषविली. सन 1992-1994 मध्ये लातूर येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोलाची कामगिरी केली. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त, पुणे येथील
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे (महाऊर्जा) महासंचालक, बृहन्मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव व विशेष कार्य अधिकारी अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी अनिल डिग्गीकर हे महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कार्यरत होते. विविध लोकाभिमुख वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे कृतिशील प्रशासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.

शंतनु गोयल हे 2012 च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी असून सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते नागपूर येथेमनरेगा आयुक्तपदी कार्यरत होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास योजनेच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ