एपीएमसी फळ बाजारात जांभूळ आवक मध्ये घट

३००-५०० रुपये प्रतिकिलो दराने जांभूळ विक्री

वाशी : दरवर्षी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात मे आणि जून महिना दरम्यान जांभळाची मोठी आवक होत असते. मात्र, यंदा जांभळाच्या मुख्य हंगामातच आवक घटल्याने एपीएमसी फळ बाजारात जांभळाचे १ ते २ टेम्पो दाखल होत आहेत. एपीएमसी फळ बाजारात ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, अंबरनाथ येथील जांभळे प्रतिकिलो ३००-५०० रुपये तर गुजरात मधील अहमदाबाद बडोदा येथील जांभळे प्रतिकिलो ३०० रुपयांनी विकली जात आहेत.

एपीएमसी फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम उतरणीला लागताच इतर जातीचे आंबे दाखल होत आहेत. त्याचबरोबर एपीएमसी फळ बाजारात मे आणि जून या दोन महिन्यात जांभूळ दाखल होते. मागील वर्षी जांभळाच्या दराने उच्चांक गाठला होता. परंतु, यंदा उत्पादन जरी कमी असले तरी जांभळाचे दर मात्र आवाक्यात आहेत. दरवर्षी एपीएमसी फळ बाजारात जांभळाच्या ३-४ गाड्या दाखल होतात. परंतु, यंदा १-२ गाड्या दाखल होत आहेत. जांभळाला पावसाअभावी पुरेसे पाणी उपलब्ध न झाल्याने फळ अधिक परिपक्व झाले नाही. त्यामुळे यंदा उत्पादन कमी आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

जांभळाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत. उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास कमी करण्यासाठी जांभूळ उपयुक्त ठरते. गॅसेसचा त्रास, कावीळ, दातदुखी, हिरड्यांना सूज, दात कमजोर, मधुमेह, पित्तशामक यावर जांभूळ गुणकारी ठरते. एपीएमसी फळ बाजारात बदलापूर, अंबरनाथ, अहमदाबाद, बडोदा येथील जांभळे दाखल होतात. परंतु, बदलापूर, अंबरनाथ येथील जांभळाचा दर्जा अधिक चांगला आहे. त्यामुळे येथील जांभळाना विशेष मागणी असते. अहमदाबाद, बडोदा येथील जांभूळ ३०० रुपये तर बदलापूर, अंबरनाथ येथील जांभळे ३००-५०० रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध आहेत. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अनिल डिग्गीकर रूजू