महापालिका द्वारे तोडक कारवाई

 

 कोपखैरणे मधील अनधिकृत झोपडपट्टी जमीनदोस्त

वाशी : नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे रेल्वे स्टेशन लगत असलेली झोपडपट्टी नवी मुंबई महापालिका द्वारे जमीनदोस्त करण्यात आली. सदर झोपडपट्टी मोकळ्या भुखंडासह रस्त्यात विसावली होती. तर चार वर्षांपूर्वी याच ठिकाणी कारवाई करताना झोपडी मधील रहिवाशांनी केलेल्या दगडफेकीत ‘कोपरखैरणे पोलीस स्टेशन'चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीराव औटी जखमी झाले होते.त्यामुळे यावेळी महापालिकेने आठही विभागातील अतिक्रमण कर्मचारी तसेच मोठ्या पोलीस बंदोबस्तात झोपडपट्टीवर तोडक कारवाई केली.

कोपरखैरणे रेल्वे स्थानक लगत आणि बालाजी चित्रपट ग्रृहासमोर कोपरखैरणे सेक्टर-९ मधील ‘सिडको'च्या भूखंडावर मोठी झोपडपट्टी उभी करण्यात आली होती. २०१८ मध्ये येथील भूखंड ‘सिडको'ने विकासकांना विकले होते. मात्र, सदर भूखंडांवर झोपडपट्टी उभी राहिल्याने नवी मुंबई महापालिका आणि सिडको प्रशासनाने या ठिकाणी टप्प्या टप्प्याने कारवाई करत येथील भूखंड मोकळे  केले होते. मात्र, त्यावेळी येथील कारवाई वादग्रस्त ठरली होती. कारवाईला विरोध म्हणून येथील झोपडी धारकांनी दगडफेक केली होती. त्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीराव औटी यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. तर एका हवालदाराच्या हाताला मार लागला होता. त्यामुळे यावेळी कारवाई करताना महापालिका प्रशासनाने  सावध भूमिका घेत कारवाईसाठी आठही विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मदत घेतली. तसेच १०० पेक्षा अधिक पोलीस  कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात ठेवण्यात आले होते. या ठिकाणी असणाऱ्या ३५ ते ४० झोपड्या तसेच पाच ते सहा ठिकाणी पदपथावरील ग्रील आणि भिंत यात कपडा बांधून तयार केलेले छत निष्कासित करण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी फळ बाजारात जांभूळ आवक मध्ये घट