वंडर्स पार्क स्काय स्विंगर राईड दुर्घटना  

सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याचे आयुक्त नार्वेकर यांचे निर्देश  

नवी मुंबई ः अवघ्या पाच दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन झालेल्या नेरुळ मधील ‘वडर्स पार्क'मधील स्काय स्विंगर या पाळणा स्वरुपातील राइडला ३ जून रोजी रात्री दुर्घटना घडल्याने या राईडवर बसलेल्या ६ व्यक्ती जखमी झाल्या आहेत. या दुर्घटनेतील सर्व जखमींना रुग्णालयात उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, अशाप्रकारची दुर्दैवी घटना घडणे अत्यंत गंभीर बाब असून याची तत्परतेने सखोल चौकशी करावी आणि कारणे तपासून संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

नुतनीकरणानंतर १ जून पासून वंडर्स पार्क नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. सध्या शालेय सुट्टीचे दिवस असल्यामुळे नागरिकांची आपल्या मुलांसह उत्साही गर्दी ‘वडर्स पार्क'मध्ये बघायला मिळत आहे. या ठिकाणी नव्याने बसविण्यात आलेल्या ७ राईडस्‌चा आनंद नागरिकांकडून घ्ोतला जात असताना ३ जून रोजी रात्री ८.३० च्या सुमारास त्यामधील स्काय स्विंगर या पाळणा स्वरुपातील राइडवर अपघात घडला. या दुर्घटनेमध्ये ६ व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.  

‘वडर्स पार्क'मधील सातही राईडस्‌ उद्‌घाटन झाल्यापासून व्यवस्थित सुरु होत्या. ‘वडर्स पार्क'चे परिचलन करणाऱ्या मे. अश्विनी कन्स्ट्रक्शन आणि इन्फ्रा यांच्यामार्फत सर्व सातही राईडस्‌ वर स्वतंत्र ऑपरेटरची व्यवस्था करण्यात असून टेक्निशियन मार्फत नियमित तपासणीही करण्यात येत होती. मात्र, ३ जून रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास टेक्निशियन मार्फत स्काय स्विंगर या राईडची तांत्रिक तपासणी सुरु असताना सदर अपघात घडल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सदर दुर्घटनेची माहापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली असून या दुर्घटनेची तत्परतेने सखोल चौकशी करावी आणि कारणे तपासून संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ‘वडर्स पार्क'मध्ये येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेतेबाबत अधिक दक्ष राहण्याचे निर्देशही महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिलेले आहेत.  

दरम्यान, वंडर्स पार्क पावसाळा कालावधीसाठी अंदाजे १५ जून पासून बंद राहणार असल्याने मुलांच्या सुट्टीचा कालावधी लक्षात घेता नागरिकांच्या मागणीनुसार वंडर्स पार्क नागरिकांसाठी खुले राहणार आहे. त्यामधील केवळ स्काय स्विंगर राईड या कालावधीत बंद असणार आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘झिरो वेस्ट स्लम मॉडेल'चा राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक