झोपड्यांवर एमआयडीसी प्रशासनाची कारवाई

घर हक्क संघर्ष समिती तर्फे ठिय्या आंदोलन

नवी मुंबई ः महापे परिसरातील झोपड्या तोडण्याची कारवाई एमआयडीसी प्रशासनाने केल्यामुळे त्या विरोधात घर हक्क संघर्ष समिती तर्फे महापे एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे आयोजन ‘नवी मुंबई शहर फेरीवाला असोसिएशन'चे अध्यक्ष तथा कामगार नेते बाळकृष्ण खोपडे यांनी केले होते.
महापे येथील एन. पी. पाटील कॉरी, शेडगे कॉरी सर्व्हे नंबर- ७६,भूखंड क्रमांक- ४ येथे मागील ३० वर्षांपासून नागरिक राहत असलेल्या झोपड्यांवर एमआयडीसी प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता २६ मे रोजी तोडक कारवाई केली. या कारवाईत ४५ झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्याने या झोपड्यांमध्ये राहणारे रहिवासी रस्त्यावर आले आहेत. विशेष म्हणजे या झोपड्या १  जानेवारी २०११ पूर्वीच्या होत्या, अशी माहिती बाळकृष्ण खोपडे यांनी दिली.

विशेष म्हणजे अग्निशमन दल, वीज पुरवठा अधिकारी, नवी मुंबई महापालिका रुग्णवाहिका डॉक्टर, यांना न कळवता झोपड्या तोडण्याची कारवाई एमआयडीसी प्रशासनाने केली. जर दुर्दैवाने काही अघटीत घटना येथे घडली असती तर काय केले असते? तसेच याला जबाबदार कोण?, असा सवालही घर हक्क संघर्ष समिती तर्फे विचारण्यात आला आहे.

महापे परिसरातील १ जानेवारी २०११ पूर्वीच्या झोपड्या तोडणाऱ्या एमआयडीसी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे, सदर झोपडी धारकांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे, तसेच या कारवाईची चौकशी झाली पाहिजे, झोपड्या तोडण्यात आलेल्या रहिवाशांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी यावेळी बाळकृष्ण खोपडे यांनी केली. ठिय्या आंदोलन ‘घर हक्क संघर्ष समिती'चे अध्यक्ष हिरामण पगार, ‘रिपब्लिकन सेना'चे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष खाजामिया पटेल, कामगार नेते बाळकृष्ण खोपडे, झोपडीधारक प्रकाश धनवडे याच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी एमआयडीसी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. आता पुढील लढा न्यायालयात लढला जाईल, असा इशारा यावेळी 'घर हक्क संघर्ष समिती'चे अध्यक्ष हिरामण पगार यांनी दिला.

ठिय्या आंदोलनात ‘शिवसेना'चे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उप जिल्हाप्रमुख संजय मढवी, उपशहर प्रमुख प्रेम चव्हाण, उपविभाग प्रमुख अनिल शिरसाट, शाखा प्रमुख बाळकृष्ण कासले, अशोक भामरे, जहागीर शेख, जयसिंग रणदिवे, शांता खोत तसेच मोठ्या संख्येने रहिवाशी उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 वंडर्स पार्क स्काय स्विंगर राईड दुर्घटना