अतिरिक्त ‘वृक्ष छाटणी'कडे महापालिका उद्यान विभागाचे दुर्लक्ष?

नवी मुंबई शहरात सर्वत्र झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटण्याचे काम वेगात

वाशी : नवी मुंबई महापालिका उद्यान विभाग मार्फत मान्सूनपूर्व झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी केली जाते. तर खाजगी सोसायटी मध्ये महापालिका परवानगीने झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी केली जाते. मात्र, झाडांच्या वाढलेल्या फांद्यांची छाटणी करताना घालून दिलेल्या नियमांपेक्षा अधिक अतिरिक्त वृक्ष छाटणी करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाशी सेक्टर-९ मध्ये अतिरिक्त वृक्ष छाटणी करण्याचा प्रकार घडला आहे. मात्र, या साऱ्या प्रकाराकडे महापालिका उद्यान विभागाचे पुरते दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरण प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

पावसाळ्यात धोकादायक वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना दरवर्षी घडत असतात. त्यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना टाळण्यासाठी महापालिका तर्फे मान्सूनपूर्व झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटणीचे काम हाती घेतले जाते. तर खाजगी सोसायट्यांना देखील झाडांची छाटणी करण्याच्या सूचना महापालिका तर्फे केल्या आहेत. त्यानुसार सद्या नवी मुंबई शहरात सगळीकडे झाडांच्या वाढलेल्या फांद्या छाटण्याचे काम वेगात सुरु आहे. परंतु, काही ठिकाणी छाटणी बाबत असलेल्या सूचनांचे पालन न करता परवानगीचा गैरफायदा घेतला जात आहे. एखादी वृक्ष छाटणी महापालिका उद्यान सहाय्यक यांच्या निगराणीखाली करणे क्रमप्राप्त आहे. तसेच झाडांचे शेंडे किंवा बुंध्यापासून तोडणे एक प्रकारे झाड तोडण्यासारखेच आहे. त्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल होऊ शकतो. मात्र, बऱ्याच वेळा वृक्ष छाटणी महापालिका उद्यान सहाय्यकांच्या अपरोक्ष केली जात असल्याने काही सोसायटीत अतिरिक्त वृक्ष छाटणी केल्याचे चित्र दिसत आहे. वाशी सेक्टर-९ मध्ये ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिरिक्त वृक्ष छाटणी करण्यात आली आहे. अतिरिक्त वृक्ष छाटणीमुळे वृक्ष सुकून मरण्याची शक्यता आहे. मागील वर्षी वाशी सेक्टर-२ मधील एका खाजगी सोसायटीत अतिरिक्त वृक्ष छाटणी करण्यात आली होती. त्यातील ३० ते ३५  % वृक्ष सद्यस्थिस्तीत सुकून मरण पावले आहेत. त्यामुळे अतिरिवत वृक्ष छाटणी झाडांच्या मुळावर उठत असतानाही महापालिका उद्यान विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पर्यावरण प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वृक्षारोपण करून साजरी केली वटपौर्णिमा