वंडर्स पार्क प्रवेशासाठी ४० ते ५० रुपये शुल्क

 वंडर्स पार्क मधील शुल्कावरुन ‘नवी मुंबई'कर नाराज

वाशी :  नवी मुंबई महापालिका द्वारे नुतनीकरण करण्यात आलेल्या नेरुळ सेवटर-१९ मधील ‘वंडर्स पार्क'चे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकार्पण केले. मात्र, या पार्क मध्ये ४० आणि ५० रुपये प्रवेश शुल्क तसेच इतर सुविधांसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे वंडर्स पार्क सर्वसामान्य नागरिकांसाठी तयार करण्यात आले आहे की कुणा ठेकेदारासाठी तयार केले आहे?, असा प्रश्न नवी मुंबई शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कोरोना काळापासून जवळजवळ ३ वर्षापेक्षा अधिक काळ बंद असलेल्या नेरुळ सेवटर-१९ मधील ‘वंडर्स पार्क'चे महापालिकेने नुतनीकरण केले आहे. वंडर्स पार्क मध्ये नव्याने करण्यात आलेल्या म्युझिकल फाऊंटन लेझर शोसहित ऑडिओ व्ह्युज्युअल यंत्रणा नविन बसविणे, तलावांची दुरुस्ती, वॉक वे सुधारणा, नव्याने विविध खेळांच्या साहित्याचे तसेच खेळण्यांखालील रबर मॅट बदलणे, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, प्रवेशद्वारावर बायोमॅट्रीक मशीन लावणे, नवीन विद्युत दिवे लावणे, उद्यानात आकर्षक कारंजे बसविणे, अशा सुविधा जवळपास २३ कोटी पेक्षा अधिकच्या खर्चातून करुन ‘वंडर्स पार्क'चे पूर्णतः नुतनीकरण केले आहे. त्यामुळे वंडर्स पार्क कधी सुरु होईल, याकडे नवी मुंबई शहरातील नागरिकांचे लक्ष लागले होते. अखेर, ३० मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ‘वंडर्स पार्क'चे लोकार्पण केले. मात्र, ‘वंडर्स पार्क' मध्ये आकारण्यात येणाऱ्या शुल्कावरून नवी मुंबईकरांच्या भुवया उंचावल्या आहेत.

‘वंडर्स पार्क' मध्ये ५ ते १२ वर्ष वयोगट ४० रुपये आणि १२ वर्षावरील सर्वांना ५० रुपये प्रवेश शुल्क असणार आहे. तर प्रत्येक राईड्‌स शुल्क - २५  रुपये,  टॉय ट्रेन शुल्क - २५  रुपये,  जॉगिंगकरता मासिक पास - ५० रुपये, दुचाकी वाहन पार्किंग - १०  रुपये, चारचाकी वाहन पार्किंग - ५० रुपये, शाळा वाहन पार्किंग - ५००  रुपये, स्मार्ट कार्ड सुरक्षा ठेव  १००  रुपये असे दर असणार आहेत. त्यामुळे ‘वंडर्स पार्क' सर्वसामान्य नागरिकांसाठी तयार करण्यात आले आहे की कुणा ठेकेदारासाठी तयार केले आहे?, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. ‘वंडर्स पार्क' मध्ये आकारण्यात शुल्काबाबत नवी मुंबई जिल्हा भाजपा सेक्रेटरी विजय घाटे यांनी नाराजी व्यक्त करत महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे.

नवी मुंबई मध्ये मोकळे मैदान उत्पन्नाचे साधन ठरु शकते याचे उत्तम उदाहरण सिडको आणि महापालिका प्रशासनाने संपूर्ण महाराष्ट्रासाठी घालून दिले असून, गार्डन मध्ये प्रवेश शुल्क घेणे, उत्तम पार्क करणे आणि प्रवेश शुल्क घेणे, उत्तम खेळाचे मैदान शाळा- कॉलेज यांना देणे आणि त्यांच्या मार्फत नागरिकांकडून खेळण्यासाठीचे शुल्क घेणे, तासावर आधारित केले पाहिजे. तसेच मॉर्निंगवॉक, योगसाठी जाणे यासाठी जिमखाना पध्दतीने लाईफ मेंबरशिप ठेवावी आणि सदरची मेंबरशिप महापालिका अधिकारी, सिडको अधिकारी, लोकप्रतीनिधी यांना लाईफ मेंबरशिप मोफत देणे, सर्वसामान्य नागरिक आपल्या मुलाबाळांना पार्कमध्ये घेऊन जाऊ इच्छितो त्यांना कमी व्याजावर लाईफ मेंबरशिफ घेण्यासाठी कर्ज उपलब्ध करुन देणे, या बाबींचा उल्लेख करत विजय घाटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न मार्गी लागण्याच्या अंतिम टप्प्यात