एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये विक्री

 नवी मुंबई मध्ये नाल्यांतील पाण्यावर पालेभाज्यांचे पीक!

तुर्भे : नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील रेल्वे स्थानकांलगत पिकणाऱ्या पालेभाज्या या गटारातील पाण्यावर पिकवण्यात येत असून, त्या किरकोळ विक्रेते अथवा हॉटेलचालकांना विकण्यात येत आहेत. आता गटारातील पाण्यावर पिकवण्यात येणारी पालेभाजी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला मार्केटमध्येही विकली जाऊ लागली आहे. नवी मुंबई, मुंबई आणि उपनगर येथील किरकोळ भाजी विक्रेते एपीएमसी मार्केट मधून गटारातील पाण्यावर पिकवण्यात येणारी पालेभाजी विक्रीसाठी नेत आहेत.
वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील भाजीपाला मार्केटमध्ये महाराष्ट्र आणि परराज्य येथून पालेभाज्या आणि फळ भाज्या विक्रीसाठी येत असतात. मात्र, मागील काही वर्षांपासून नवी मुंबई मधील जुईनगर, तुर्भे ते एरोली, मानखुर्द, ठाणे, कल्याण, भिवंडी भागातील रेल्वे रुळालगत नाल्यातील सांडपाण्यावर पिकवली जाणारी भाजी एपीएमसी मार्केटमध्ये विकण्यास येत आहे.

सांडपाण्यावर पिकवल्या जाणाऱ्या भाज्यांमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती आहे. मार्केटमध्ये या पालेभाज्यांची आवक वाढली आहे. रेल्वे रुळाजवळील जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून रेल्वे प्रशासन सदर जागा शेतकऱ्यांना नाममात्र शुल्क आकारुन  भाडेतत्त्वावर देते. पण, त्या जागेत शेती म्हणून झटपट पिकणाऱ्या पालेभाज्यांची लागवड केली जाते. मात्र, पालेभाजी पिकविण्यासाठी  सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले नाल्यातील सांडपाणी वापरले जाते. परंतु, गटारातील पाण्यावर पिकवण्यात येणाऱ्या पालेभाज्यांचा शरीरावर घातक परिणाम होतो, असे तज्ञांचे मत आहे.

रेल्वे स्थानकांदरम्यान छोटे वाफे करुन पालेभाज्या पिकवण्यात येतात. यात पालक, चवळी, भेंडी, लालमाठ, माठ, मुळा, कांद्याची पात आदी भाज्यांचा समावेश आहे. मात्र, या पालेभाज्या पिकविण्यासाठी रेल्वे रुळांलगत असलेल्या गटारातील आणि नाल्यातील रसायनयुक्त सांडपाण्याचा वापर करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. नाल्यातील सांडपाण्यामध्ये असलेल्या रासायनिक पदार्थांमुळे रेल्वे रुळालगत पिकविल्या जाणाऱ्या पालेभाज्यांचे सेवन करणाऱ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची चिंता काहींनी व्यक्त केली आहे. या भाज्यांमुळे पोटाचे आणि शरीरावर दूरगामी परिणाम करणारे गंभीर आजार होण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

नाल्यातील आणि गटारातील सांडपाण्यात वेगवेगळ्या प्रकारची रसायने, विषारी वायू, शौचालयाचे सांडपाणी आदी शरीरास अपाय करणारी द्रव्य असतात. यातील प्रामुख्याने नायट्रोजन, शिसे, फॉस्फरस आणि इतर विषारी द्रव्य मानवी शरीराला अपायकारक आहेत. नायट्रोजन लालपेशीमध्ये प्रवेश करुन प्राणवायूच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण करतो. शिसे आणि इतर जडधातू रोगप्रतिकारक शक्ती क्षीण करते. तसेच रेल्वे रुळालगत नाल्यातील पाण्यावर पिकविल्या जाणाऱ्या पालेभाज्या खाणाऱ्यांना श्वसनाचे आजार होण्याची शक्यता जास्त असते. अमिबासारखे जीव गाजर किंवा मुळा यासारख्या केशमुळातून शरीरात जातात. त्यामुळे लहान मुलांना अतिसाराचा त्रास होण्याची शक्यता असते. सामान्य नागरिकांना रेल्वे रुळालगत नाल्यातील पाण्यावर पिकविण्यात येणाऱ्या पालेभाज्या खाऊन शारीरिक हानी होत असल्याचे लक्षात येऊनही कोणीही तक्रार करण्यास पुढे न आल्याने झटपट वाढणाऱ्या पालेभाज्या आणि फुकटचे सांडपाणी यामुळे रेल्वे रुळालगत पालेभाज्या पिकविणाऱ्या तथाकथित शेतकऱ्यांचे फावले आहे. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सीआरझेड'मधून बालाजी मंदिर स्थलांतरीत करा