भारतातील विविध कलादालने, नामांकित चित्रकारांचा समावेश

वरळी मधील नेहरु सेंटर मध्ये ‘द आर्ट फेअर'

नवी मुंबई ः आईसीएसी आणि जे एस आर्ट गॅलरी आयोजित भव्य कला महोत्सव ‘द आर्ट फेअर'चे आयोजन मुंबई मधील वरळी येथील प्रसिध्द नेहरु सेंटर मध्ये १ ते ४ जून २०२३ या दरम्यान करण्यात आले आहे. भव्य कला महोत्सव सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांना पाहायला मिळणार आहे. या कला महोत्सवाचे उद्‌घाटन आज १ जून २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता होणार असून, याप्रसंगी कला आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सदर महोत्सवात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ४०० पेक्षा जास्त चित्रकार आणि शिल्पकार भाग घेणार असून, त्यांच्या १५०० पेक्षा अधिक कलाकृतींचा आणि ५० विविध कलादालनांचा समावेश महोत्सवात करण्यात आला आहे.

‘इंटरनेशनल क्रिएटिव आर्ट सेंटर'चे (आईसीएसी) संस्थापक रविंद्र मारडिया आणि ‘जे एस आर्ट गॅलरी'चे संस्थापक सूरज लाहेरु यांनी आयोजित्त केलेल्या या कला महोत्सवात अनेक प्रथितयश तसेच समकालीन चित्रकार आणि शिल्पकार यांच्या तैलरंग, जलरंग, अक्रीलिक, चारकोल, मिक्स मीडियम, ब्राेंझ, फोटोग्राफी, धातुशिल्प वास्तववादी आणि निम्न वास्तववादी तसेच अमूर्त शैलीतील कलाकृतींचे सादरीकरण होणार आहे. विद्यमान कलाजगतातील चित्रकारांच्या आणि शिल्पकारांच्या विविधांगी, वैशिष्ट्यपूर्ण अशा १५०० पेक्षा जास्त कलाकृती बघण्याची सुवर्णसंधी सर्व कलाप्रेमी आणि रसिकांना या कला मेळाव्यात मिळणार आहे. याशिवाय या प्रदर्शनात अनेक चित्रकारांचा लाईव्ह डेमो पाहायला मिळणार असून, कला परीक्षकांद्वारा निवडण्यात आलेल्या उत्कृष्ट चित्रकार आणि शिल्पकारांना पुरस्कार दिले जाणार आहेत.  

सदर कला महोत्सवात राबी आर्ट गॅलरी (शांतिनिकेतन), डोलना आर्ट गॅलरी (मुंबई), तूलिका आर्ट गॅलरी (मुंबई), एमिनेंट आर्ट गॅलरी (दिल्ली), गॅलरी १६ (दिल्ली), जेड आर्ट गॅलरी (मुंबई), डेसर्ट आर्ट गॅलरी (दुबई), कला संस्कृती आर्ट गॅलरी (मुंबई), प्राची आर्ट गॅलरी (मुंबई), श्रीजन आर्ट गॅलरी (नवी मुंबई) या आर्ट गॅलरींचा समावेश असून, रबींद्रनाथ टागोर, नंदलाल बोस, बिनोद बिहारी मुखर्जी, रामकिंकर बैज, एम. एफ. हुसैन, एफ. एन. सौजा, गणेश पायने, सोमनाथ हारे, सुहास रॉय, शक्ति बर्मन, जामिनी रॉय, बिकास भट्टाचार्य, लालू प्रसाद शॉ, के. जी. सुब्रमनियन, के. लक्ष्मण गौड़, जोगेन चौधुरी, बोस कृष्णामाचारी, माधवी पारीख, परेश माइटी या नामांकित चित्रकारांच्या कलाकृती रसिकांना रोज सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत विनामुल्य पाहायला मिळणार आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐन उन्हाळ्यात रहिवाशांचे पुरेशा पाण्याविना हाल