महापालिका द्वारे नोटिसांची परंपरा कायम

एपीएमसी आवारातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास चर्चेच्या गर्तेत?

वाशी ः नवी शहरातील धोकादायक इमारतींची यादी नवी मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळापूर्वी जाहीर करते. या धोकादायक इमारतींचा आता पुनर्विकास होत आहे. मात्र, वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील इमारती वर्षानुवर्षे महापालिकेच्या धोकादायक यादीत समाविष्ट होत असून, या इमारतींचा पुनर्विकास अजूनही चर्चेच्या गर्तेत अडकला असल्याने  एपीएमसी आवारातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचे घोंगडे भिजत पडले आहे. त्यामुळे यंदाही एपीएमसी आवारातील धोकादायक इमारतींमधील व्यापाऱ्यांना जीव मुठीत धरुन व्यापार करावा लागणार आहे.

 सन १९८२ मध्ये एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटच्या इमारतीची उभारणी करण्यात आली होती. एपीएमसी बाजार आवारातील इमारतीची बांधणी सिडको निर्मित असून, अल्पावधीतच या इमारती धोकादायक झाल्या आहेत. २००५ पासून या इमारतींचा धोकादायक यादीत समाविष्ट होत आला आहे. एपीएमसी प्रशासन आणि व्यापारी यांच्यातील वादामुळे एपीएमसी आवारातील धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीचे काम रखडले आहे. एपीएमसी बाजाराच्या पुनर्बांधणीचा निर्णय न्यायालयात प्रलंबित आहे. तसेच एपीएमसी आवारातील धोकादायक इमारतींची स्थिती दिवसेंदिवस ढासळत आहे. बहुतांशी धोकादायक इमारती मोडकळीस आल्या आहेत. नुकतीच नवी मुंबई महापालिकेने धोकादायक इमारतीची यादी जाहीर केली असून, यात एपीएमसी कांदा-बटाटा मार्केट मधील गाळे आणि मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारतीला अतिधोकादायक म्हणून नोटीस पाठविली आहे. मात्र, एपीएमसी प्रशासनाकडे धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीकरिता निधी उपलब्ध नसल्याने इतर पर्यायाचा शोध सुरु होता. बाजार समितीत एपीएमसी संचालक मंडळ येताच कांदा-बटाटा बाजाराच्या विकासाबरोबरच इतर चारही बाजाराचा पुनर्विकास एकत्रितपणे करण्याचा निर्णय एपीएमसी संचालक मंडळाने घेतला होता. खासगी विकासकाच्या माध्यमातून ‘एपीएमसी मार्केट'ची पुनर्बांधणी करण्याचे नियोजन होते. परंतु, आता एपीएमसी संचालक मंडळावरही टांगती तलवार असून, एपीएमसी संचालक मंडळ पूर्ण नसल्याने धोरणात्मक निर्णय ठप्प आहेत. त्यामुळे लवकरच एपीएमसी आवारातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीला सुरुवात होईल अशी अपेक्षा असताना आता त्यालाही खो बसला असून, एपीएमसी बाजारातील धोकादायक इमारतींना खाली करण्याची नोटीस पाठविण्याचे सत्र सुरुच आहे. त्यामुळे एखादी आपत्तीजनक घटना घडल्यानंतरच एपीएमसी बाजाराचा पुनर्विकास होणार का?, असा प्रश्न एपीएमसी बाजार घटकांकडून उपस्थित केला जात आहे.

एपीएमसी मार्केट मधील कांदा-बटाटा बाजारातील गाळे आणि मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारतीला नवी मुंबई महापालिकेने  अतिधोकादायक इमारती असल्याची नोटीस पाठविली आहे. एपीएमसी प्रशासनाकडून अतिधोकादायक इमारत खाली करण्याची नोटीस देण्यात येणार आहे. - मेहबूब बेपारी, कार्यकारी अभियंता - एपीएमसी, वाशी. , एपीएमसी

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

भारतातील विविध कलादालने, नामांकित चित्रकारांचा समावेश