स्वाधार योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी नेरूळमध्ये विशेष कार्यक्रम

सामाजिक न्याय विभागाच्या स्वाधार योजनेच्या प्रचार व प्रसिध्दीसाठी नेरूळमध्ये विशेष कार्यक्रम

नवी मुंबई : सामाजिक न्याय विभागाची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना ही विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची असून या योजनेचा प्रचार व प्रसिध्दी मोठया प्रमाणात होणे गरजेचे आहे, तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण, मुंबई विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त, वंदना कोचुरे यांनी केले.

 गुरुवार दि.1 जून रोजी नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ लॉ येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, ठाणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वाधार योजनेच्या प्रचार व प्रसिध्दी कार्यक्रमात वंदना कोचुरे बोलत होत्या. यावेळी समाजकल्याण ठाणेचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे व प्राचार्य अजय पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ लॉ येथे समान संधी केंद्राचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी वंदना कोचूरे यांनी, ज्या विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळत नाही व शिक्षणापासून वंचित रहावे लागते, अशा विद्यार्थ्यांसाठी शासनाने सन 2016-17 या वर्षापासून  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली आहे. या योजनेव्दारे विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी उदरनिर्वाहसाठी ठराविक रक्कम दिली जाते. विद्यार्थ्याना या योजनेची माहिती व्हावी यासाठी सदर योजनेचा प्रचार व प्रसिध्दी होणे गरजेचे आहे. असे त्या म्हणाल्या. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ लॉच्या वतीने समान संधी केंद्राव्दारे शासनाच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत निश्चित मदत मिळेल, व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व आर्थिक विकास होणेस चालना मिळेल, असेही वंदना कोचुरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी स्वाधार योजनेचा लाभ घेतलेल्या ठाणे जिल्हयातील विद्यार्थ्यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. यावेळी कॉलेजचे प्राचार्य अजय पाटील यांनीही डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप सदैव समाज कल्याण विभागाला सहकार्य करेल, असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्या.अधिक्षिका वर्षा बिलये यांनी केले. सदर कार्यक्रमास विद्यार्थी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका द्वारे नोटिसांची परंपरा कायम