अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस तर कंत्राटदार कंपनीला 5 लाखांचा दंड

रस्त्यांच्या कामात त्रुटी आढळल्याबाबत आयुक्त अभिजीत बांगर यांचीअभियंता व ठेकेदारावर कारवाई
 

ठाणे  : ठाणेकर नागरिकांना चांगल्या दर्जाचे खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध व्हावेत यासाठी ठाणे शहराला राज्यशासनाकडून उपलब्ध झालेल्या 605 कोटी रुपयांच्या निधीतंर्गत विविध ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांची पाहणी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. या पाहणीदौऱ्यादरम्यान कामांमध्ये रस्ते साफसफाई व इतर कामांबाबत त्रुटी आढळल्या, मा. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार सदर कामाबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करुन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी कार्यकारी अभियंता यांना 'कारणे दाखवा' नोटीस तर ठेकेदाराला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

 मा. ना. मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात (22 मे रोजी) ठाणे शहरातील रस्ते आणि नाले सफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. या पाहणी दौऱ्यात वसंत विहार येथील कॉनवुड चौक येथील मलनिस्सारण कामाची पाहणी करून कामास विलंब झाल्याबद्दल कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

 ठाणे शहरासाठी राज्य शासनाकडून ६०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या अंतर्गत सध्या २८२ रस्त्यांची कामे प्रभाग समितीनिहाय सुरू आहेत. यात २१४ कोटी रुपयांच्या पहिल्या पॅकेजमध्ये १२७  रस्त्यांची कामे सुरू आहेत. तर उर्वरित ३९१ कोटी रुपयांच्या दुसऱ्या पॅकेजमध्ये १५५ रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची कामे,  सरकारी योजनांमधून सुरू असलेली रस्त्यांची कामे, इतर प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी देखील मा. मुख्यमंत्री यांनी केली.

 उद्यान ठेकेदारांना नोटीसा

 टिकूजीनीवाडी  सर्कल ते नीळकंट रौड रस्ता दुभाजक व हरित जनपथ या ठिकाणी निगा व देखभाल योग्यरित्या नसल्याचे आढळून आले. या ठिकाणी झाडे सुकलेल्या अवस्थेत आहेत. तसेच सदर ठिकाणी पालापोचाळा, प्लॅस्टिक व इतर कचरा साठलेला दिसून आला. हरित जनपथामध्ये मोकळी जागा निदर्शनास आल्याने मे. निसर्ग लॅण्डस्केप प्रा.लि. या कंपनीच्या ठेकेदाराला आयुक्त बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच सदर नोटीशीत सुकलेली झाडे काढून तेथे नवीन झाडे लावणे, मोकळया जागेत नव्याने झाडे लावणे व जंगली गवत झाडे काढण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत गावंडबाग ते हिरानंदानी मिडोज येथील रस्ता दुभाजक व हरित जनपथात अनेक ठिकाणी झाडे लावून सुशोभिकरण करणे अपेक्षित असताना मोकळ्या जागा निदर्शनास आल्या. तसेच रस्ता दुभाजक व हरित जनपथात अनेक ठिकाणी गवत/ तण नियमित काढले न गेल्याने त्याची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचे दिसून आले. तसेच झाडांना नियमित पाणी दिले जात नसल्याने झाडे सुकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मे. पायोनिअर आऊटडोअर मिडीया सोल्युशन प्रा.लि. या कंपनीच्या ठेकेदाराला आयुक्त बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
 
ठेकेदाराला 5 लाखांचा दंड

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वर्तकनगर, लोकमान्य- सावरकरनगर, नौपाडा, कोपरी, कळवा प्रभाग समितीमधील विविध रस्त्यांचे डांबरीकरणाने पुर्नपृष्ठीकरणाचे काम मे. आर.पी. एस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. या कामादरम्यान कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आढळून आलेल्या नाहीत. मास्टीक, अस्फाल्ट पध्दतीने करावयाच्या डांबरीकरणाच्या कामाध्ये काम करणाऱ्या मजदूरांना, सुरक्षिततेच्या दृष्टीने सेफ्टी शूज, हॅण्डग्लोज, हेल्मेट उपलब्ध करुन देण्यात आलेले नसल्याचे दिसून आले त्यामुळे या कंत्राटदार कंपनीला 5 लाख  रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

 रस्ते साफसफाई ठेकेदारालाही नोटीस

वर्तकनगर प्रभागसमिती अंतर्गत येत असलेल्या पवार नगर येथील रस्ते साफसफाईचा ठेका व्यंकटेशा या कंपनीस देण्यात आलेला आहे. परंतु नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील दैनंदिन रस्त्याची योग्य प्रकारे साफसफाई न करणे. तसेच रस्‌त्यावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना गणेवश, तसेच इतर सुरक्षा साधने दिले नसल्याचे आढळून आले. रस्त्यावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग निदर्शनास आल्याने संबंधित ठेकेदारास नोटीस बजावून दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.  तसेच सदर ठेकेदाराच्या  कामकाजात सुधारणा करणेकरीता सक्त ताकीद आली असून कामकाजात अपेक्षीत सकारात्मक सुधारणा न झाल्यास आपले कंत्राट मुदतपूर्व संपुष्टात आणून आपणास काळ्या यादीत का टाकण्यात येऊ नये ? याबाबतचा खुलासा सादर करण्याचे निर्देश आयुक्त बांगर यांनी नोटीशीद्वारे दिले आहेत.

 निगा देखभालीची जबाबदारी पार न पाडणाऱ्यांवर होणार कारवाई

 महापालिका क्षेत्रातील उद्याने अद्ययावत रहावीत यासाठी ठेकेदार पध्दतीने जाहिरातीच्या बदल्यात उद्यान, चौक व ब्रीज खालील मोकळ्या जागा सुशोभित करण्याबाबतचा करार करण्यात आला आहे. मे. पायोनिअर आडटडोअर मिडीया सोल्युशन प्रा.लि. कंपनीला वर्तकनगर प्रभागसमिती गावंडबाग ते हिरानंदानी मिडोज येथील दुभाजक व हरित जनपथाची निगा देखभाल करणे. मे. रोनक ॲडर्व्हटायझिंग या कंपनीला एमएमआरडीए व एमएसआरडीसी ब्रीज खालील मोकळ्या जागा सुशोभित करणे, ठाणे शहरातील 50 चौक तसेच ठाणे स्थानक परिसर सुशोभित करणे. मे. ॲड स्पेस पब्लिसिटी एलएल पी यांना जेल तलाव ते गोल्डन डाईज नाका, तीन पेट्रोल पंप ते मखमली तलाव, भास्कर कॉलनी ते नौपाडा प्रभाग समिती येथील ब्रीज खालील मोकळ्या जागा सुशोभित करणे. तसेच सारथी ॲडर्व्हटायझिंग यांना रमाबाई आंबेडकर उद्यान सुशोभिकरणाचा ठेका देण्यात आला आहे. या कंपनीबरोबर केलेल्या करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार उद्यानांची दैनंदिन निगा व देखभाल योग्यप्रकारे राखली न गेल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचा इशारा आयुक्त  बांगर यांनी दिला आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घणसोली मधील जागा धार्मिक स्थळासाठी देण्याची मागणी