घणसोली मधील जागा धार्मिक स्थळासाठी देण्याची मागणी  

बौध्द बांधवांची सिडको विरोधात निदर्शने

नवी मुंबई ः सिडको प्रशासन होश में आव! होश में आव! असा नारा देत बौध्द बांधवांनी सिडको प्रशासनावर हल्लाबोल करत जोरदार निदर्शने केली. घणसोली, सेक्टर-४ येथे बौध्द बांधवांनी आपल्या धार्मिक प्रार्थनेसाठी ‘बुध्दघोष विहार' बांधलेले असून याठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याकडून पुजा-अर्चना सुरु आहे. परंतु, या ‘बुध्द विहार'ची जागा सिडको प्रशासनाने इतर सोसायटीला देऊन बौध्द बांधवांचे खच्चीकरण केले आहे. त्यामुळे नवी मुंबईतील समस्त बौध्द बांधवांनी गट तट विसरुन ३० मे रोजी एकत्र येत वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सिडको प्रशासनाचा निषेध केला.  

सन २००७ पासून घणसोली मधील सदर जागेवर बुध्द विहार असून सदरची जागा बौध्द बांधवांच्या धार्मिक स्थळासाठी कायमस्वरुपी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक,  शैक्षणिक संस्थेला देण्यात यावी, अशी मागणी सन २०१० पासून ‘सिडको'कडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. ‘सिडको'च्या नियमाप्रमाणे सदर जागेचे पैसे भरण्याची तयारी देखील संस्थेने दर्शविली आहे. मात्र, त्यानंतर देखील सिडको प्रशासनाने २०१४ मध्ये बुध्द विहार असलेली सदरची जागा समर्थ को-ऑप. सोसायटीला दिली आहे. त्यामुळे सिडको विरोधात बौध्द बांधवांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

‘सिडको'च्या या अन्यायकारी भूमिकेविरोधात नवी मुंबईतील समस्त बौध्द बांधवांनी गट-तट विसरुन एकत्र येऊन वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आक्रोश निर्माण करीत सिडको प्रशासनाचा निषेध केला. या आंदोलनाचे नेतृत्व ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक, शैक्षणिक संस्था'चे अध्यक्ष रमेश बनसोडे, ‘बुध्द विहार बचाव कृती समिती'चे सचिव सचिन कटारे यांनी केले.

सदर आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ‘बुध्द विहार संवर्धन समितीे'चे अध्यक्ष प्रा. जी. के. डोंगरगांवकर, ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया'चे (आठवले) पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष महेश खरे, टिळक जाधव, विजय कांबळे, ‘राष्ट्रवादी'चे नवी मुंबई अध्यक्ष नामदेव भगत, शिवसेना कामगार आघाडीचे प्रदीप वाघमारे, ‘रिपब्लिकन सेना'चे प्रकाश वानखेडे, रेखाताई इंगळे, ‘शिवसेना'चे गौतम बळवंते, ‘भीम आर्मी संघटना'चे पाईकराव, ‘वंचित बहुजन आघाडी'चे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष भूषण कासारे यांच्यासह इतर प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिकेच्या  विविध विकास कामांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण व भूमीपूजन संपन्न