सुनियोजित नवी मुंबई शहराला बकालपण

वाशी गावातील २६३ अनधिकृत झोपड्यांवर तोडक कारवाई

वाशी ः नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने महापालिका उपायुक्त (अतिक्रमण विरोधी विभाग) सोमनाथ पोटरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी विभाग अधिकारी अमित कुमार सोंडगे यांच्या द्वारे २९ मे रोजी वाशी गावातील उच्च दाबाच्या वीज वाहिनीखाली असलेल्या अनधिकृत झोपडपट्टीवर तोडक कारवाई करण्यात आली.
 आधुनिक शहर म्हणून नवी मुंबई शहराची ओळख आहे. मात्र, याच नवी मुंबई शहरात काही भूमाफियांच्या माध्यमातून अनधिकृत झोपड्यांचे साम्राज्य उभे राहत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराला बकालपण येत आहे. नवी मुंबई शहरात सध्या मोठ्या प्रमाणात शासकीय जागेत बेकायदा झोपड्या उभ्या राहत आहेत.

वाशी गावातील उच्च दाबाच्या वीज वाहिनी खाली भूखंड क्रमांक-१ वर देखील अनधिकृत झोपडपट्टी उभी राहिली होती. याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महापालिका वाशी विभाग अधिकारी अमित कुमार सोंडगे आणि वाशी विभाग अतिक्रमण विरोधी पथकाने जेसीबीच्या साह्याने वाशी गावातील उच्च दाबाच्या वीज वाहिनीखाली उभारण्यात आलेल्या २६३ अनधिकृत झोपड्या जमीनदोस्त करण्याची कारवाई केली. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कारवाईमुळे अनधिकृत झोपड्या उभ्या करणाऱ्या भुमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान, वाशी विभागातील अनधिकृत बांधकामे आणि अवैध झोपड्या जमीनदोस्त करण्याची कारवाई यापुढेही करण्यात येणार आहे, असे महापालिका वाशी विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अमित कुमार सोंडगे यांनी सांगितले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रत्येक विभागांच्या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद दल नेमावे