ऐरोली मुलुंड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी  

रबाळे-ऐरोली पासून थेट मुलुंड पर्यंत 3 किमीच्या पुढे वाहनांच्या रांगा  

नवी मुंबई ः ‘ठाणे'हून ‘बेलापूर'च्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरवरील अवजड स्टीलचे बंडल ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाले येथे पडल्याचे निमित्त झाल्याने ३० मे रोजी दिवसभर रबाले पासून ऐरोली-मुलुंड पर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. या वाहतूक कोंडीत शेकडो जड-अवजड वाहनांसोबतच बेस्ट, एनएमएमटी आणि एसटीच्या अनेक बसेस अडकून पडल्या. त्यातच बाहेरच्या उकाड्यामुळे आधीच त्रस्त असलेले शेकडो प्रवासी दोन तासांपेक्षा जास्त काळ खाजगी वाहनांमध्ये तसेच सार्वजनिक उपक्रमाच्या वाहनात अडकून पडल्याने या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरसावलेल्या वाहतूक पोलिसांची सुध्दा चांगलीच तारांबळ उडाली होती.  

मुंब्रा बायपास मार्गाच्या दुरुस्तीमुळे त्या मार्गावरील वाहतूक रबाले-ऐरोली-मुलुंड मार्गे ठाण्याच्या दिशेने वळविण्यात आली आहे. त्यामुळे आधीच या मार्गावर गत महिन्याभरापासून वाहतूक कोंडी सदृश्य परिस्थिती आहे. त्यातच ३० मे रोजी सकाळी ठाणे येथूण ‘बेलापूर'च्या दिशेने जाणाऱ्या ट्रेलरवरील अवजड स्टीलचे बंडल तुटून ते ठाणे-बेलापूर मार्गावर रबाले येथे भररस्त्यात पडले. त्यामुळे ऐन सकाळच्या वेळेसे रबाले-ऐरोली-मुलुंड मार्गावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे रबाले नाकापासून ऐरोली ते मुलुंडच्या भांडुप पंपिंग स्टेशन पर्यंत वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. रबाले वाहतूक शाखेतील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची सदर वाहतूक कोंडी फोडताना चांगलीच तारांबळ उडाली होती.  

या वाहतूक कोंडीत शेकडो खाजगी वाहने तसेच बेस्ट, एनएमएमटी आणि एसटीच्या बसेस अडकून पडल्या होत्या. मुलुंड पासून ऐरोली पर्यंत पोहोचण्यासाठी या वाहनांना तब्बल एक ते दिड तासाचा कालावधी लागत होता. त्यामुळे सार्वजनिक उपक्रमाच्या बसेस मधून कामानिमित्त जाणारे हजारो प्रवाशी या वाहनांमध्ये अडकून पडल्याने त्यांना सदर वाहतूक कोंडीचा फुकटचा मनस्ताप सहन करावा लागला. उकाडल्यामुळे त्रस्त असलेले शेकडो नागरिक या वाहतूक कोंडीत दोन-दोन तास विनाकारण अडकून पडल्याने त्यांचे चांगलेच हाल झाले. मुलुंड येथून वाशी येथे महाविद्यालयात परीक्षेसाठी येणारे काही विद्यार्थी सदर वाहतूक कोंडीत अडकून पडल्याने त्यांना परीक्षेला वेळेवर पोहोचता आले नाही. परिणामी, परीक्षेत अनुपस्थित राहिलेल्या या विद्यार्थ्यांची गैरहजेरी लागली आहे.  

रबाले वाहतूक पोलिसांनी या वाहतूक कोंडीतील जड वाहने ऐरोली सर्कल येथून पटनीमार्गे वळवून वाहतूक कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी वाहतूक पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. रबाले वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर पडलेले स्टीलचे अवजड बंडल छोट्या क्रेनच्या माध्यमातून उचलून बाजुला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्टीलच्या बंडलचे वजन जास्त असल्याने ते बाजुला करता आले नाही. त्यामुळे दुपारी ३ च्या सुमारास हायड्रा क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले अवजड स्टीलचे बंडल उचलून बाजुला काढण्यात आल्यानंतर सायंकाळी या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी झाली. मात्र, सदर प्रकारामुळे ऐरोली ते मुलुंड मार्गावर दिवसभर वाहतूक कोंडी सदृश्य परिस्थिती होती.  

अवजड असलेले स्टीलचे बंडल ठाणे-बेलापूर मार्गावर रबाले येथे पडल्याने सकाळी ८ पासून ऐरोली-मुलुंड मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी जड वाहने दुसऱ्या मार्गाने वळवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. दुपारनंतर हायड्रा क्रेनच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेले अवजड स्टीलचे बंडल बाजुला काढण्यात आल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु झाली आहे.  - गोपाळ कोळी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक-रबाले वाहतूक शाखा. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मेगा इंडस्ट्रीयल एक्सपोनिमित्त मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री येणार