महापालिका क्षेत्रात १ हजार ६५० लघुउद्योजक

४२४ लघुउद्योजकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मालमत्ता कर भरण्यासाठी नोटीस

तुर्भे : नवी मुंबई महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास नकार देणाऱ्या ४२४ लघुउद्योजकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मालमत्ता कर भरण्यासाठी नोटीसा बजावण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. यातील अनेक उद्योजकांनी अगदी महापालिकेच्या स्थापनेपासून मालमत्ता कर भरलेला नाही. या थकबाकीदारांकडून अनुमाने १५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम महापालिकेला प्राप्त होणार आहे, अशी माहिती नवी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी दिली.

ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टीतील लघुउद्योजकांनी आपण औद्योगिक क्षेत्रात असल्याने महापालिकेने लागू केलेला मालमत्ता कर भरणार नसल्याचे सांगत आंदोलन केले. नंतर लघुउद्योजकांनी महापालिका औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा देत नसल्याचा दावा करत मालमत्ता कर भरण्यास नकार देत न्यायालयात याचिका प्रविष्ट केली. उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सदर प्रकरण गेले. अखेर मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सर्व थकबाकीदार लघुउद्योजकांनी मालमत्ता कर भरला नाही, तर पुढील सुनावणी घ्ोणार नाही, असे स्पष्ट केले. तसेच कर वसुलीसाठी मालमत्ता कर थकबाकीदार लघुउद्योजकांच्या मालमत्ता सील करण्याचेही आदेश दिले.

महापालिका क्षेत्रात अनुमाने १ हजार ६५० लघुउद्योजक असून, त्यापैकी मालमत्ता कराची मूळ रक्कम भरणारे ५९७ लघुउद्योजक आहेत.  नियमितपणे कर भरणारे ४९७ लघुउद्योजक असून त्यांच्याकडून सुमारे ९ कोटी ५० लाख रुपये मालमत्ता कर प्राप्त झाला आहे. ४२४ लघुउद्योजक कर भरत नव्हते. आता महापालिकेचा मालमत्ता कर भरण्यास नकार देणाऱ्या ४२४ लघुउद्योजकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार  महापालिकेचा मालमत्ता कर भरावा लागणार आहे, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी सांगितले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्टीतील लघुउद्योजकांनी मालमत्ता कराचा भरणा करुन महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी केले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ऐरोली मुलुंड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी