‘सी ट्‌वेंटी परिषद'द्वारे सामाजिक संस्थांमध्ये आत्मविश्वासाची पेरणी

सामाजिक संस्थांची सी-ट्‌वेंटी परिषद संपन्न

नवी मुंबई: श्री श्री शंकर सेवा समिती आणि स्वामी विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २७ मे रोजी वाशी येथील ‘नवी मुंबई स्पोर्टस्‌ असोसिएशन'च्या सभागृहात सामाजिक संस्थांची सी-ट्‌वेंटी परिषद आयोजित करण्यात आली होती.

‘जी-२०शिखर परिषद'चे यजमानपद भूषविण्याचा मान यावर्षी भारताला लाभला आहे. वसुधैव कुटुंबकम्‌ संकल्पनेवर आर्थिक, सामाजिक, उद्योग विषयक अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. नवी मुंबईत ‘जी-२०शिखर परिषद'च्या अंतर्गत  ‘सामाजिक संस्थांच्या परिषद'चे आयोजन करण्यात आले होते. या ‘परिषद'मध्ये नवी मुंबई, ठाणे पालघर जिल्हा आणि राज्यातील अन्य भागातून आलेल्या सामाजिक संस्थांनी त्यांचे कार्य उपस्थितांसमोर ठेवले.
त्याचबरोबर येणाऱ्या अडचणी विशद केल्या. खासकरुन उद्योग जगतातून सहकार्याची अपेक्षा या संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली. सदर परिषद प्रसंगी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ'चे सेवक तथा विद्युत-अभियंता विवेकानंद वडके, आ. गणेश नाईक, ‘स्वामी विवेकानंद केंद्र-कन्याकुमारी'चे विवेक सुपण्णवार, ‘स्वामी विवेकानंद केंद्र'च्या कार्यकर्त्या वंदना महाजनी, मीनाताई देशपांडे, दीपक नामजोशी, सुधीर बोरवटकर, ललिताताई, कमलेश पटेल, श्रीदेवी चपळताई, पुनम सिंह, आदि उपस्थित होते.

 विवेकानंद वडके यांचे बीज भाषण झाले.  देशातील अनेकता हीच आपली ताकद आहे. समाजासाठी काम करणाऱ्या संस्था या ‘परिषद'मध्ये सहभागी झाल्या असून या संस्थांसाठी अशा प्रकारच्या परिषद पुढील वाटचालीसाठी उपयुक्त ठरतात, असे मत त्यांनी मांडले. सुपण्णवार यांनी स्वामी विवेकानंद यांचा विश्वबंधुत्वाचा विचार उपस्थितांसमोर ठेवला.


मीनाताई देशपांडे यांनी सेवा आणि कुटुंब यांचे महत्त्व सांगितले. वंदना महाजनी यांनी सामाजिक संस्थांच्या परिषद मधून जगातील देश एकमेकांवर अवलंबून असून परस्पर विश्वास, परस्पर सन्मान आणि विश्वबंधुत्वाच्या भावनेतून एकत्रित सहकार्य करण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आल्याचे नमूद केले. ‘श्री श्री शंकर सेवा समिती'च्या गायत्री महापात्रा यांनी यावेळी सांगितले की, ‘जी-२०शिखर परिषद'चे यजमानपद भारतासाठी अभिमानास्पद आहे. त्याच धर्तीवर आता सार्वजनिक आणि सामाजिक संस्थांमध्ये चांगला समन्वय असल्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘मुर्तस्वरुप...राग गौड मल्हार'चे प्रकाशन