३१ मे रोजी सकाळी अल्प दाबाने पाणी

३० मे रोजी पाणीपुरवठा दिवसभर बंद

तुर्भे ः नवी मुंबई महापालिकेच्या भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र आणि मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनीवर देखभाल दुरुस्तीची तसेच इतर आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे ३० मे या दिवशी संध्याकाळी मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती महापालिका अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी दिली.

नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मान्सूनपूर्व कामे मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. यामध्ये जलउदंचन केंद्रातील पंप आणि अन्य यंत्रसामुग्री यांची देखभाल करणे, पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास पर्यायी वीज व्यवस्था उपलब्ध करणे, जलवाहिन्यांच्या गळतीची दुरुस्ती करणे, सर्व जलवाहिन्यांची देखभाल दुरुस्ती करणे आदी कामे चालू आहेत. याशिवाय ३० मे या दिवशी भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्र, मोरबे धरण ते दिघा मुख्य जलवाहिनी या ठिकाणी देखभाल दुरुस्तीची आणि इतर कामे करण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने भोकरपाडा जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा ३० मे २०२३ रोजी सकाळी १० ते रात्री १० या दरम्यान १२ तासांकरीता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे  ३० मे या दिवशी संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाही. तसेच ३१ मे या दिवशी सकाळी पाणीपुरवठा अल्प दाबाने होणार आहे.

नवी मुंबई शहरात ३० मे रोजी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नवी मुंबई महापालिका क्षेत्र तसेच कामोठे, खारघर नोड मधील नागरीकांनी आवश्यक पाण्याचा साठा करावा तसेच ३० मे ते ३१ मे या कालावधीत पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करुन नवी मुंबई महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका द्वारे करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उचित कार्यवाही करण्यासाठी पुरातत्व विभाग संचालकांच्या सूचना