नवी मुंबई परिसरातील ११० पेक्षा अधिक महिला रिक्षाचालकांना लाभ

आरटीओ कार्यालय तर्फे महिला रिक्षाचालकांची आरोग्य तपासणी

तुर्भे ः नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) तर्फे महिला रिक्षाचालकांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या शिबिरात श्री सत्य साई वैद्यकीय सेंटर, महाराष्ट्र यांच्या मार्फत मोफत औषधे आणि डॉक्टर्स उपलब्ध करुन देण्यात आले होते.

वाहन चालवतांना चालकांचे निरोगी डोळे, उत्तम स्वास्थ असेल, तर अपघातांचे प्रमाण अल्प होण्यास सहाय्य होईल, या उद्देशाने सदर आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते, अशी माहिती नवी मुंबई सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी दिली. या शिबिरात महिलांची संपूर्ण तपासणी, हृदय तपासणी, ईसीजी, रक्तदाब तपासणी, मेंदू तपासणी, कान, नाक, घसा, दात तपासणी तसेच हाडांची तपासणी करण्यात आली.
या शिबिराचा नवी मुंबई परिसरातील ११० पेक्षा अधिक महिला रिक्षाचालकांनी लाभ घ्ोतला. या शिबिरात सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विशाखा ठाकरे यांनी रस्ता सुरक्षा विषयी मार्गदर्शन केले. या वेळी उपस्थित रिक्षाचालक महिलांच्या कुटुंबीयांनाही शिबिराचा लाभ उपलब्ध करुन देण्यात आला. या शिबिराला सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांचे सहकार्य लाभले.

नवी मुंबई शहरातील अपघातावार नियंत्रण मिळवण्यासाठी शुन्य अपघाताच्या दृष्टीकोनातून नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या द्वारे हेल्मेट वाटप, चौकसभा, आरोग्य शिबिरे, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती गजानन गावंडे यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

३१ मे रोजी सकाळी अल्प दाबाने पाणी