शहराच्या शाश्वत विकासासाठी ‘केडीएमसी'चे ७ कलमी मुद्दे -आयुक्त गोयल
३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणाऱ्या जलकलश रथयात्रेस हिरवा झेंडा दाखविताना आनंद - राज्यपाल रमेश बैस
छत्रपती शिवरायांचे कार्य प्रेरणादायी -राज्यपाल रमेश बैस
मुंबई ः ‘हिंदवी स्वराज्य'चे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे व्यक्तिमत्व दूरदृष्टीचे होते. त्यामुळे त्यांनी नौदलाची उभारणी केली होती. म्हणूनच त्यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी जाणाऱ्या जलकलश रथयात्रेस हिरवा झेंडा दाखविताना आनंद होत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
‘श्री छत्रपती शिवाजी महाराजांना सहस्त्र जल कलशाभिषेकाचा संकल्प'साठी ११०८ पवित्र जलकलश आणण्यात आले आहेत. त्याचा जलपुजन सोहळा २६ मे रोजी राजभवन येथे राज्यपाल बैस यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. जलकलशांचा प्रवास मुंबई ते रायगड असा होणार आहे. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, महंत सुधीरदास महाराज, ‘श्री शिवराज्याभिषेक दिन सेवा समिती'चे सदस्य सुनील थोरात, आदि उपस्थित होते.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी मी शुभेच्छा देतो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या जयंती सोहळ्याचा एक भाग बनणे, मी माझा विशेष सन्मान समजतो. किल्ले रायगड येथे २ जून २०२३ रोजी होणाऱ्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी भारतातील सर्व नद्या, तलाव आणि जलकुंभांमधून पवित्र पाणी गोळा केले जात आहे, ते जाणून मला आनंद झाला आहे, असे राज्यपाल रमेश बैस म्हणाले.
‘हिंदवी स्वराज्य'चे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि कार्य प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. ते एक दूरदर्शी राजे होते, ज्यांनी इंग्रज आणि मुगल यांच्यापासून राज्याला असलेला धोका वेळीच ओळखला होता. परकीय शक्तींनी उभे केलेले आव्हान ओळखून शिवाजी महाराजांनी आपले नौदल उभारले. उद्योग आणि व्यापाराबाबत त्यांचे धोरण दूरदर्शी होते.ते महिला सक्षमीकरण आणि सन्मानाच्या बाजूने होते, असे राज्यपाल बैस म्हणाले.