पोलीस पत्नींच्या मुलाखतींवर आधारित पुस्तकाचे अजित पारसनीस यांच्या हस्ते प्रकाशन

पोलीस पत्नींच्या मुलाखतींवर आधारित पुस्तकाचे अजित पारसनीस यांच्या हस्ते प्रकाशन 

 

नवी मुंबई ः ग्रंथाली प्रकाशन, भाग्यश्री फाऊंडेशन आणि प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवाची शक्ती भाग-२' या शिल्पा जितेंद्र खेर लिखित पोलीस पत्नींच्या मुलाखतींवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांच्या हस्ते वाशी येथील साहित्य मंदिर सभागृह येथे संपन्न झाले.
याप्रसंगी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सह-पोलीस आयुक्त संजय मोहिते, मेजर सुभाष गावंड तसेच ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, भाग्यश्री फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र खेर, आदि उपस्थित होते.

सध्याचे वातावरण पाहता पोलिसांना यापुढे अग्नीपथावरुन चालावे लागणार आहे. परंतु, आमचे पोलीस दल सर्व प्रसंगांचा सामना धैर्याने आणि सक्षमपणे करेल आणि नेहमीप्रमाणे पोलिसांना धर्मपत्नी त्यांची पूर्णपणे साथ देतील, असा आशावाद यावेळी माजी पोलीस महासंचालक अजित पारसनीस यांनी व्यक्त केला. यावेळी पारसनीस यांनी त्यांच्या दिवगंत पत्नीच्या काही आठवणींना उजाळा दिला. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अतिशय सुंदर पध्दतीने सदर पुस्तकाचे विश्लेषण केले. समाजातील सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस देत असलेले फार मोठे योगदान या पुस्तकातील तरुणांच्या संवादातून चांगल्या प्रकारे समजून येते, असे ते म्हणाले. पोलीस दलातील शिपाई, अधिकारी यांचे कार्य इतके जबाबदारीचे असते की आपल्या कुटुंबाच्या साथीशिवाय ते पार पाडणे अशक्य असल्याचे सह-पोलीस आयुक्त संजय मोहिते यांनी यावेळी म्हणाले. तर लग्नानंतर आपण आयपीएसची परीक्षा दिली असून त्याचा अभ्यास करताना आपल्या पत्नीने त्यावेळी सर्व नोटस्‌ तयार करुन अभ्यासासाठी सहकार्य केले. या गोष्टीचा संजय मोहिते यांनी यावेळी
आर्वजून उल्लेख केला.

पोलीस पत्नींच्या जीवनातील विविध घटनांवर आधारित असलेल्या या पुस्तकाचे मुख्य उद्दिष्ट आपला पती सामाजिक सुरक्षेचे दायित्व खंबीरपणे निभावत असताना आपल्या घराची बाजू समर्थपणे सांभाळणाऱ्या पत्नीचे मानसिक सामर्थ्य समाजासमोर मांडायचे असल्याचे या पुस्तकाच्या लेखिका शिल्पा खेर यावेळी म्हणाल्या.

या सर्व पोलीस पत्नींचे व्यक्तिमत्त्व सक्षम आहे. त्यांच्याकडील संयम, धैर्य, सहनशीलता या गुणांद्वारे आपला संसार त्यांनी कशाप्रकारे यशस्वी केला ते खरंच तरुणांनी शिकण्यासारखे असल्याचे मेजर सुभाष गावंड यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. याप्रसंगी अलका राजवाडे, भारती मोहिते, प्रिती परदेशी, डॉ. सोनाली देशमुख, रोहिणी जोशी, श्रावणी येरुणकर या पोलीस पत्नींच्या मुलाखती डॉ. लतिका भानुशाली यांनी घेतल्या. सदर पुस्तकाला निवृत्त पोलीस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर यांची अतिशय समपर्कक प्रस्तावना लाभली आहे. सदर पुस्तक वाचून झाल्यावर माझ्याप्रमाणेच वाचकही पोलीस पत्नींना मनापासून सलाम करतील, याची खात्री मला असे मीरा बोरवणकर यांनी नमूद केले आहे. तसेच सर्व पोलीस दलाकडे लोक नक्कीच एक पूर्णत नवीन प्रशंसापूर्ण दृष्टीकोनातून पाहतील, असेही डॉ. बोरवणकर म्हणाल्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल-मेडीकल कॉलेज प्रकल्पाचे सादरीकरण