महापालिकेला ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप ॲवॉर्ड' पुरस्कार प्रदान

 ‘नवी मुंबई'च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

नवी मुंबई ः अर्थ डे नेटवर्क इंडिया या मानांकित संस्थेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शहरांचा ‘अर्थ डे नेटवर्क स्टार म्युनिसिपल लिडरशीप ॲवॉर्ड'ने गौरव करण्यात आलेला आहे. यामध्ये ‘सिंगल युज प्लास्टिक फ्री कार्यालय' करुन ‘प्लास्टिक फ्री शहर'कडे वाटचाल करणाऱ्या नवी मुंबई महापालिकेस ‘स्टार म्युनिसिपल लिडरशीप ॲवॉर्ड' या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
या अनुषंगाने संस्थेमार्फत प्रकाशित करण्यात आलेल्या ई-बुक मध्ये नवी मुंबईच्या प्लास्टिक प्रतिबंधात्मक कामगिरीचा विशेष उल्लेख करण्यात आलेला आहे. या पुरस्काराचे प्राप्त झालेले सन्मानचिन्ह नवी मुंबईकर नागरिकांनी याकामी दिलेल्या सक्रिय सहभागामुळे प्राप्त झाले असल्याचे सांगत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सदर पुरस्कार नवी मुंबईकर नागरिकांना समर्पित केलेला आहे. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते.

पर्यावरण विषयक पायाभूत व कृतिशील कामगिरी करणाऱ्या महापालिकांना अर्थ डे नेटवर्क इंडिया या संस्थेच्या वतीने ‘स्टार म्युनिलिपल लिडरशीप पुरस्कार' प्रदान करुन सन्मानित करण्यात येत असून भारत सरकारच्या ‘लाईफ मिशन'मध्ये दर्शविल्याप्रमाणे शाश्वत जीवनशैली अंगीकारण्यासाठी काम करणाऱ्या संस्थांना अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा मिळण्याकरिता या पुरस्काराने प्रोत्साहित करण्यात येत आहे.
 हर्बल हस्तीदंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोला या दुर्मिळ औषधी वनस्पतीपासून बनविलेले आकर्षक स्मृतिचन्ह नवी मुंबई महापालिकेला पुरस्कार स्वरुपात प्रदान करण्यात आले असून त्यामध्येही पर्यावरण जपणूक करण्यात आलेली आहे.
 अर्थ डे नेटवर्क संस्थेने यानिमित्त प्रकाशित केलेल्या पुरस्कारार्थींच्या कामगिरीचा आढावा घ्ोणाऱ्या ई-बुक मध्ये महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई महापालिकेने आपले कार्यालय सिंगल युज प्लास्टिक फ्री घोषित केले असून याद्वारे एकल प्लास्टिकवर प्रतिबंध घालण्याचा संदेश अप्रत्यक्षपणे नागरिकांमध्ये प्रसारित केला आहे, असा आवर्जुन उल्लेख केलेला आहे. यासोबतच महापालिकेच्या वतीने प्लास्टिक प्रतिबंधाविषयी विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती करण्यासोबतच प्रभावी रितीने प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहिमा राबविण्यातही महापालिका पुढाकार घ्ोत असल्याचे नमूद केलेले आहे. सन २०२२ मध्ये नवी मुंबई महापालिकेने ३ लाख किलोपेक्षा जास्त प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या असून ३ लाखाहून अधिक दंडात्मक रक्कम वसूल केलेली आहे, असेही नमूद करण्यात आलेले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राज्याच्या गृह विभागाने पोलिस निरीक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती जाहीर