सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वी तेथील नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे आदेश

महापालिका क्षेत्रात १५ संभाव्य ठिकाणी दरड कोसळण्याची शक्वता

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पावसाळापूर्व कामांच्या तयारीच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून नवी मुंबईतील सर्व शासकिय प्राधिकरणे आणि स्वयंसेवी संस्था यांची समन्वय बैठक घ्ोतली होती. यामध्ये त्यांनी पावसाळी कालावधीत नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यादृष्टीने विहित वेळेत पावसाळापूर्व कामे पूर्ण करावीत आणि पावसाळा कालावधीत परस्पर संपर्क राखण्याचे निर्देशित केले होते.

त्या अनुषंगाने महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या नैसर्गिक नालेसफाई, बंदिस्त गटारे, मलनिःस्सारण वाहिन्या यांच्या सफाई कामांची प्रत्यक्ष पाहणी करताना सदर कामाला वेग देण्याचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी निर्देश दिले आहेत.

त्याचप्रमाणे दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या संभाव्य ठिकाणांची संबंधित विभाग अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याबाबत त्वरित कार्यवाही सुरु करावी, असेही बैठकीमध्ये आयुक्तांमार्फत निर्देशित करण्यात आले होते.

या अनुषंगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे महापालिका क्षेत्रातील १५ संभाव्य ठिकाणांची यादी प्राप्त झाली असून त्यामधील रमेश मेटल ववॉरी परिसराला भेट देऊन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच विभाग अधिकारी आणि विभागातील संबंधित अधिकारी यांच्यासह प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली.

पावसाळी कालावधीपूर्वी खबरदारीची उपाययोजना म्हणून येथील नागरिकांना सुयोग्य जागी हलविण्याचे निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी यावेळी दिले. अशाच प्रकारे सर्व विभाग कार्यालयांनीही आपापल्या क्षेत्रातील दगडखाणी परिसर आणि दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी काटेकोर लक्ष ठेवून तेथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

त्याचप्रमाणे तुर्भे एमआयडीसी परिसरातील मेढकर ववॉरी भागात सुरु असलेल्या नालेसफाई कामाचीही आयुक्तांनी बारकाईने पाहणी केली. याठिकाणी डोंगर भागातून वाहत येणारे मोठे दगड नाल्यांमधून वाहत येत असल्याने कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केली.

याप्रसंगी एमआयडीसी क्षेत्रात नेरुळ डी-ब्लॉक मध्ये सुरु असलेल्या रस्ते कॉँक्रिटीकरण कामांचीही पाहणी करत आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी पावसाळ्यापूर्वी सदर कामे पूर्ण करुन त्यांच्या गुणवत्तेकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश अभियांत्रिकी विभागाला दिले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाणथळ क्षेत्रांवर क्राँकीटच्या जंगलांसाठी परवानगी देऊ नये