चाचण्या पूर्ण केल्या मात्र, उरण रेल्वे प्रत्यक्षात धावायला किती वेळ लागेल ?

चाचण्या आवरा अन्‌ उरण रेल्वे सुरु करा

उरण ः मागील तपापासून सुरु असलेल्या उरण रेल्वेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आता प्रत्येक महिन्यातील तारखेला उरण रेल्वे सुरु असल्याचे वृत्त येत आहे. आजवर रेल्वे प्रशासनाने नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर अनेक चाचण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, उरण रेल्वे प्रत्यक्षात धावायला किती वेळ लागेल? याबाबत अद्याप तरी अस्पष्टता आहे. यामुळे आता चाचण्या आवरा अन्‌ उरण-नवी मुंबई रेल्वे सुरु करा, अशी मागणी उरणकर नागरिक करीत आहेत.
सिडको आणि रेल्वे यांच्या भागीदारीत सुरु करण्यात आलेल्या १७८२ कोटी खर्चाच्या नेरुळ (नवी मुंबई)- उरण रेल्वे मार्ग २७ किमी लांबीचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. नेरुळ-उरण या नवी मुंबई शहराला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाला १९६७ सालीच मंजुरी मिळाली आहे. पण, रेल्वे मार्गाला सुरुवात करण्यासाठी तब्बल अनेक वर्षं वाट पहावी लागली आहे. सुरुवातीला रेल्वे मार्गाचा अंदाजे खर्च ४९८ कोटी होता. यात सातत्याने झालेल्या कामाच्या विलंबामुळे कामाचा खर्च आता १२८४ कोटींनी वाढून तो १७८२ कोटींच्या घरात पोहोचला आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२०११ सालापासून सुरु झालेल्या नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील प्रकल्पाचे काम रखडत रखडत सुरु आहे. कधी वन, पर्यावरण, खारफुटींचे तर खासगी जमिनी संपादित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून होणारा विरोध यामुळे पहिल्याच टप्प्याचे काम पूर्ण होण्यासाठी २०१८ पर्यंत वाट पहावी लागली. या पहिल्या टप्प्यातील रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरुळ, सीवुडस्‌, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ कि.मी. अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
त्यानंतर उर्वरित गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी, उरण या स्टेशन दरम्यान १५ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आले आहेत. त्यामुळे स्टेशनची उभारणी, रेल्वे ट्रॅक टाकणे, ओव्हरहेड वायर, उड्डाणपुल उभारण्याच्या कामांनी वेग घ्ोतला आहे. कामात होणारा विलंब खर्चाच्या वाढीस कारणीभूत ठरत असल्याने मध्य रेल्वे प्रशासनानेही कामाचा वेग वाढविला आहे. ‘मध्य रेल्वे'चे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांनीही दुसऱ्या टप्प्यातील रखडलेली कामे पूर्ण करुन नेरुळ-उरण रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरु करण्याची २२ सप्टेंबर २०२२ पर्यंतची डेडलाईन याआधीच जाहीर केली होती.
 प्रत्यक्षात पाहणीनंतरही गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी, उरण या स्टेशन दरम्यान १५ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील कामे गतीने सुरु असल्याचे दिसून येत आहेत. मात्र, गव्हाण (जासई) स्टेशन उभारणीचे काम काही अंशी अपूर्ण अवस्थेत आहे. तसेच धुतूम, नवघर, बोकडविरा ग्रामस्थांनी ग्रामपंचायत स्तरावरुन मुळ महसूली गावाच्या रेल्वे स्थानकांसाठी उभारलेल्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सिडको आणि रेल्वे प्रशासनाला अपयश येत आहे. त्यामुळे सप्टेंबर २०२२ नंतरची ३१ मार्च २०२३ ची डेडलाईन रेल्वे प्रशासनाकडून हुकली आहे. एकंदरीत सिडको आणि रेल्वे प्रशासन शाश्वती देण्यास तयार नाही. त्यात काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. यामुळे ५० वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या उरणकरांना नेरुळ-उरण  रेल्वे मार्गावर रेल्वे धावण्याची आणखी वाट पहावी लागणार आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुरक्षेच्या दृष्टीने पावसाळ्यापूर्वी तेथील नागरिकांना स्थलांतरीत करण्याचे आदेश