‘वंडर्स पार्क'चे मेकओव्हरसाठी महापालिकेकडून २३ कोटींचा खर्च

नेरुळ येथील ‘वंडर्स पार्क'चे उद्‌घाटन लांबणीवर ; ज्येष्ठांसह बच्चे कंपनीचा हिरमोड

नवी मुंबई ः नवी मुंबई शहराचे आकर्षण असलेल्या नेरुळ येथील ‘वंडर्स पार्क'चे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ मिळत नसल्याने रखडले आहे. यासंदर्भात ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'च्या शिष्टमंडळाने नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना १८ मे रोजी निवेदन दिले. या शिष्टमंडळात ‘मनविसे'चे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, प्रतिक खेडकर, श्रेयस शिंदे, दशरथ सुरवसे यांचा समावेश होता.

नेरुळ येथील वंडर्स पार्क, नवी मुंबई शहरातील लँडमार्क असून, नवी मुंबई शहराबरोबरच उरण, पनवेल, ठाणे, मुंबई या शहरातील अबालवृध्दांचे महत्त्वाचे प्रेक्षणीय ठिकाण आहे. सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या वंडर्स पार्क मध्ये विविध दुरुस्तीची तसेच नव्याने सुरु करण्यात येणाऱ्या आकर्षक खेळांची व्यवस्था सज्ज आहे.

कोरोना काळापासून जवळजवळ अडीच वर्षांपेक्षा अधिक काळ सर्वसामान्यांसाठी वंडर्स पार्क बंद आहे. त्यामुळे वंडर्स पार्क कधी सुरु होणार याची उत्सुकता शाळांना सुट्टी लागलेल्या बच्चे कंपनीसह पालकांना आहे. १ मे महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळाली नसल्याने नवी मुंबई महापालिकेचे शहर अभियंता यांनी ३ मे पर्यंत संबंधित सर्व विभागांना आपापल्या विभागाची कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

कोरोना प्रादुर्भावामुळे अडीच वर्षांपासून बंदच असलेले वंडर्स पार्क ‘महाराष्ट्र दिन'च्या शुभ मुहूर्तावर पुन्हा गजबजणार का, याची चर्चा त्यावेळी नवी मुंबई शहरात सुरु झाली होती. महापालिकेने वंडर्स पार्क सुरु करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागितली होती. अनेक दिवसांपासून ‘वंडर्स्र पार्क'ला आवश्यक असणाऱ्या विद्युत सबस्टेशनचे काम पूर्ण झाले असल्याची माहितीही महापालिकेकडून त्यावेळी देण्यात आली होती. आता महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त हुकल्यामुळे वंडर्स पार्क कधी गजबजणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नेरुळ येथील ‘वंडर्स'चे मेकओव्हर करण्यात आले आहे. वंडर्स पार्कमध्ये असलेली आकर्षक खेळणी, जगातील सात आश्चर्य दाखवणाऱ्या प्रतिकृती यासह अँम्पिथिएटर याबरोबरच आकर्षक तलाव, खेळण्यासाठी असलेली प्रशस्त खेळण्याची जागा यामुळे येथे नेहमीच गर्दी पाहायला मिळत होती. आता त्यात नव्याने करण्यात आलेल्या म्युझिकल फाउंटन लेझर शोसहित, नवीन ऑडिओ व्हिज्युअल यंत्रणा बसविणे, तलावांची दुरुस्ती, वॉक वे सुधारणा, नव्याने विविध खेळांच्या साहित्याचे तसेच खेळण्यांखालील रबर मॅट बदलणे, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविणे, प्रवेशद्वारावर बायोमॅट्रिक मशीन लावणे, नवीन विद्युत दिवे लावणे, उद्यानात आकर्षक कारंजे, अशा जवळजवळ २३ कोटींपेक्षा अधिकच्या खर्चातून ‘वंडर्स पार्क'चे पूर्णतः मेकओव्हर करण्यात आल्याचे ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'ने निवेदनात नमूद व्ोÀले आहे.

नेरुळ मधील ‘वंडर्स पार्क'ला नेहमीच मोठी गर्दी पाहायला मिळते. या उद्यानात नवी मुंबईसह ठाणे, खारघर, उरण, पनवेल येथून टॉय ट्रेन तसेच विविध खेळण्यांची मजा घ्ोण्यासाठी नागरिक येतात. आता पार्कमधील खेळण्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. त्यातच मुले-मुलींना लागलेल्या सुट्ट्यांमुळे नव्याने सुरु होणाऱ्या ‘वंडर्स पार्क'ची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. बच्चे कंपनीसाठी आकर्षण असलेले वंडर्स पार्क सुरू करण्यासाठी पालकांची मागणी वाढू लागली आहे. आगामी काळात मुंबईतील नेहरु सायन्स सेंटरप्रमाणे नवी मुंबई मधील विज्ञान केंद्र देखील नावारुपाला येईल, असे काम याच पार्क शेजारी वेगाने सुरु आहे.

‘वंडर्स पार्क'चे काम पूर्ण होऊनही केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वेळ मिळत नसल्याने ‘वंडर्स पार्क'चे उद्‌घाटन रखडले आहे. याबाबत नवी मुंबईकरांच्या असंख्य तक्रारी ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'कडे आल्यावर ‘वंडर्स पार्क'चे महापालिकेने लवकरात लवकर उदघाटन करुन वंडर्स पार्क सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करावे, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना'ने महापालिका आयुक्तांना निवेदनातून केली आहे. अन्यथा नागरिक आणि बच्चेकंपनी यांना सोबत घ्ोऊन 'मनसे स्टाईल'ने आंदोलन करत ‘वंडर्स पार्क' सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात येईल, असा इशारा ‘मनविसे'ने महापालिकेला निवेदनातून दिला आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

निवाऱ्याचा प्रश्न म्हणून ग्रामीण भागांमध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने रमाई आवास योजना