कांदळवनात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे एकूण १११ ठिकाणे निश्चित

कांदळवन मधील तिसऱ्या डोळ्याला आणखी ७ ते ८ महिन्यांची प्रतीक्षा ?

वाशी ः नवी मुंबई शहरासह ठाणे, भिवंडी येथील कांदळवनात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार नवी मुंबई मध्ये १११ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार होते. मात्र, सदर कामाची अजून निविदाच काढण्यात आली नसल्याने सीसीटिव्ही बसवण्यास अजून सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती कांदळवन अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील जागेला सोन्याचा भाव मिळत असल्याने काही असामाजिक तत्वांकडून खाडी मधील कांदळवनावर अतिक्रमण करुन जमिनी विकण्याचा, भाड्याने देण्याचा कारभार सुरु आहे. मात्र, या प्रकाराने कांदळवन सोबत खाडीतील जैवविविधता  देखील नष्ट होत चालली आहे. त्यामुळे याबत आता राज्य शासन सजग झाले असून, मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील कांदळवनावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली २०२१ मध्ये घेण्यात आला होता. यासाठी ३५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सीसीटीव्ही कॅमेरे प्रकल्प तीन टप्प्यात राबविण्याचे निश्चित करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात भिवंडी, दुसऱ्या टप्प्यात पश्चिम आणि मध्य मुंबई तर तिसऱ्या टप्प्यात नवी मुंबई, ठाणे खाडी पलेमिंगो अभयारण्याचा समावेश आहे. त्यासाठी वन खात्याकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याकरिता एकूण १११ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या कामाचे आता प्रस्ताव तयार करण्यात आले असून, त्यानंतर निविदा प्रकिया राबवण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र ठेकेदारास सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे कंत्राट देण्यात येणार आहे. या साऱ्या प्रकियेला किमान सात ते आठ महिने लागणार असल्याची माहिती कांदळवन अधिकाऱ्यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आई एकविरा देवी बद्दल काही आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी पोलीस ठाणे मध्ये तक्रार