महापालिकेचा विभाग कार्यालये सक्षमीकरणावर भर

आयुक्त राजेश नार्वेकर यांची बेलापूर विभागापासून प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात

नवी मुंबई : महापालिकेशी संबंधित कामांबाबत नागरिकांचा नियमित संपर्क विभाग कार्यालयांशी असतो. त्या अनुषंगाने विभाग कार्यालयामध्ये जाऊन तेथील कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यास महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सुरुवात केली असून १९ मे रोजी त्यांनी बेलापूर विभाग कार्यालयाचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त  सुजाता ढोले आणि संजय काकडे, प्रशासन विभागाचे उपायुक्त नितीन नार्वेकर, शहर अभियंता संजय देसाई, उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, डॉ. अमरीश पटनिगीरे, सोमनाथ पोटरे, अनंत जाधव, दिलीप नेरकर, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, शिरीष आरदवाड आणि सर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी आणि कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

विभाग कार्यालयांसाठी महापालिकेच्या आकृतीबंधात मंजूर झालेला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आराखडा जाणून घेत प्रत्यक्षात विभाग कार्यालयात कार्यरत असलेल्या विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांची आयुक्त नार्वेकर यांनी बारकाईने माहिती घेतली. प्रत्येक अधिकारी-कर्मचारी यांच्या कामाचे स्वरुप जाणून घत आयुक्तांनी सर्वच विभाग कार्यालयातील विद्यमान स्थितीची माहिती घेतली.

नागरिकांच्या सोयीसाठी विभाग कार्यालयांमध्ये सुरु असलेल्या नागरी सुविधा केंद्रातील उपलब्ध सेवांची माहिती घेत नागरिकांना विभाग कार्यालयात येण्याची गरजच भासू नये अशाप्रकारे अधिकाधिक सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्तांनी संगणक विभागाला दिले.

बेलापूर विभागात सद्यस्थितीत सुरु असलेल्या कामांची माहिती घेत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी किती कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार याचीही माहिती जाणून घेतली. पावसाळा कालावधीच्या अनुषंगाने बेलापूर विभागात सुरु असलेल्या नालेसफाई, बंदिस्त गटारे सफाई, मलनिःस्सारण वाहिन्या सफाई कामांचा परिसरनिहाय आढावा घेत काम झाल्यावर त्याठिकाणची झाकणे व्यवस्थित लावली जातील, याची काळजी घेण्याचे निर्देश दिले. सदर कामाची जबाबदारी संबंधित भागाचा कनिष्ठ अभियंता आणि स्वच्छता अधिकारी यांच्यावर निश्चित करण्याच्या सूचनाही आयुक्त नार्वेकर यांनी यावेळी केल्या. नालेसफाई कामांची सद्यस्थिती जाणून घेताना सदर कामे विहित कालावधीत पूर्ण करण्याच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विशेषत्वाने सेक्टर-४, ५, ६ येथील नाल्याची सफाई अधिक काळजीपूर्वक करण्याचे निर्देश देत त्याठिकाणी २-४ दिवसात कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

मुसळधार पाऊस आणि मोठ्या भरतीची वेळ जमून आल्यास पावसाळ्यात शहरातील काही सखल भागात पाणी साचून राहते अशी १४ ठिकाणे शहरात असून त्यांची सविस्तर माहिती घेत त्याठिकाणी पाणी उपसा पंपांची संख्या वाढवावी आणि पाणी साचून राहणार नाही याची संपूर्ण दक्षता घ्यावी. दिघा रेल्वे स्थानकाच्या बांधकामामुळे पावसाळी कालावधीत त्याच्या आसपासच्या परिसरात पाणी साचणार नाही याची खातरजमा करुन घ्यावी अशा स्पष्ट सूचना दिघा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता आणि परिमंडळ उपायुक्तांना देण्यात आल्या.

धोकादायक इमारतींची यादी लवकरात लवकर प्रसिध्द करावी. जेणेकरुन त्या इमारतीतील नागरिकांना स्थलांतरीत होण्यासाठी पुरेसा कालावधी उपलब्ध होईल, असे सूचित करतानाच आयुक्तांनी विभागनिहाय सी-१ कॅटेगरीतील इमारतींच्या स्थितीचा आढावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना स्थलांतरीत करावे, असे निर्देश आयुवत नार्वेकर यांनी विभाग अधिकारी यांना दिले. स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने केंद्रीय सर्वेक्षणाच्या दृष्टीने सज्ज राहण्याचे निर्देशित करतानाच सर्व संबंधित घटकांनी चेकलिस्ट प्रमाणे प्रत्येक बाबीची नियमित तपासणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

केंद्र सरकारच्या सूचनांनुसार ५ जूनपर्यंत ‘२१ डेज चॅलेंज' ‘थ्री आर' उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे  आयोजन करावयाचे असून त्यामध्ये लोकसहभागाला विशेष प्राधान्य द्यावयाचे असल्याच्या सूचना आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान, विभाग अधिकारी आपल्या विभाग क्षेत्राचा प्रमुख असून त्याचे विभागातील प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष हवे, अशी अपेक्षा व्यक्त करीत आयुक्त राजेश नार्वेकर यांनी विभाग कार्यालये सक्षमीकरणावर भर दिला आहे. त्याअनुषंगाने त्यांनी तेथे प्रत्यक्ष जाऊन आणि तेथील कामकाजाचा आढावा घेऊन कार्यवाही करण्याचे निश्चित केले आहे. त्यादृष्टीने विभाग कार्यालयातील आढावा बैठकींना सुरुवात केली आहे.

धोकादायक झाडांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देशित करतानाच मुख्य रस्त्यावरील झाडांची छाटणी करावी, झाडे तोडू नयेत. त्याचप्रमाणे छाटणी केलेल्या झाडांच्या फांद्या लगेच उचलल्या जातील याचे भान ठेवून संबंधित विभागातील उद्यान अधिकारी आणि स्वच्छता अधिकारी यांनी परस्पर समन्वय ठेवावा. झाडे छाटणी वाहन पोहोचत नाही अशा ठिकाणी मनुष्यबळाचा वापर करुन आवश्यक झाडे छाटणी करावी. या कामात उद्यान विभाग आणि विभाग कार्यालय यांनी परस्पर समन्वय राखावा. उड्डाणपूल, भिंती, पदपथाचे कॉर्नर्स येथील फटीमध्ये उगवणारी वड, पिंपळ अशी वृक्षरोपे निदर्शनास येताच काढून टाकली जावीत.-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादनात घट