अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी नगरविकास विभागाचा महापालिका प्रशासनावर दबाव

 महापालिका सेवेत दाखल होण्याचा नवा पायंडा!

नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीत तरतूद नसतानाही राज्याचे नगरविकास विभाग, राज्याच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याचा (बालरोगतज्ञ) थेट नवी मुंबई महापालिकेच्या आस्थापनेवर उपायुक्त म्हणून कायमस्वरुपी समावेश करण्यासाठी आतूर झाल्याचे दिसून येत आहे. सदर अधिकाऱ्याचे महापालिकेत कायमस्वरुपी समावेशन होण्यासाठी नगरविकास विभाग महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करुन यासंदर्भात ठराव मंजूर करुन स्वयंस्पष्ट अभिप्रायासह तातडीने प्रस्ताव पाठविण्यासाठी तगादा लावत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शासनाने मंजूर केलेल्या नवी मुंबई महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमातील अटी नुसार पात्र ठरत नसतानाही शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून नावाला नेमणूक असलेले डॉ. राहुल गेठे आता नवी मुंबई महापालिकेत उपायुक्त पदावर थेट कायमस्वरुपी समावेशन होण्याकरिता प्रयत्नशील आहेत. तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे डॉ. राहुल गेठे विशेष कार्य अधिकारी म्हणून अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. वर्षभरापूर्वी नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आपली वर्णी लावण्यास ते अपयशी ठरले होते. तर आता नवी मुंबई महापालिकेत उपायुक्त या संवर्गातील पदावर थेट कायम समावेशन करण्यासाठी त्यांची धडपड सुरु झाली आहे. परंतु, उपायुक्त या संवर्गातील पदावर थेट कायम समावेशन महापालिकेमार्फत करण्याबाबतची तरतूद शासनाने मंजूर केलेल्या महापालिका सेवा प्रवेश नियमात नाही. त्यामुळे शासन स्तरावरुनच डॉ. राहुल गेठे यांची नवी मुंबई महापालिकेत थेट नियुक्ती करण्याची कार्यवाही व्हावी, असा प्रस्ताव मंजूर करुन महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश नार्वेकर यांनी नगरविकास विभागास पाठविला आहे.

दरम्यान, पात्र नसतानाही महापालिका सेवेत थेट कायमस्वरुपी वशिल्याने नियुक्ती करण्याच्या या प्रकाराविरोधात महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांनी संताप व्यक्त केला आहे. डॉ. राहुल गेठे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांच्या प्रतिनियुक्तीला गेल्या वर्षी नवी मुंबईतील भाजपा पदाधिकाऱ्यांंनी देखील आक्षेप घ्ोत तत्कालीन आयुक्तांना पत्र देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आता राज्याचे मुख्यमंत्री असल्याने डॉ. राहुल गेठे यांच्या महत्वाकांक्षा वाढल्या असून त्यांना आता नवी मुंबई महापालिकेत कायमस्वरुपी नेमणूक पाहिजे आहे. त्याकरिता २७ फेब्रुवारी रोजी नगरविकास विभागाने नवी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून डॉ. राहुल गेठे यांची सेवा महापालिकेच्या शासनमान्य प्रचलित सेवा प्रवेश नियमानुसार नवी मुंबई महापालिकेत कायमस्वरुपी वर्ग करणे नियमोचित आहे किंवा कसे याबाबत स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करण्यास सांगितले होते.

त्याअनुषंगाने १३ एप्रिल रोजी या संदर्भात नियमोचित कार्यवाही शासन स्तरावरुन होणे उचित होईल, असे अभिप्राय महापालिकेतर्फे देण्यात आले होते. परंतु, नगरविकास विभागाने २६ एप्रिल रोजी महापालिका आयुक्तांना पुन्हा पत्र पाठवून डॉ. राहुल गेठे यांचे नवी मुंबई महापालिकेत समावेशन करण्यात येणार असल्यास त्याबाबत ठरावाची प्रत आणि स्वयंस्पष्ट अभिप्राय तत्काळ सादर करण्यास सांगून त्याचदिवशी तातडीने प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. यावरुनच नियमात बसत नसतानाही एका अधिकाऱ्यासाठी नगरविकास विभाग किती पायघड्या घालणार? असा प्रश्न महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, नवी मुंबई महापालिकेत कायमस्वरुपी आपले बस्तान मांडण्यासाठी डॉ. राहुल गेठे यांच्याकडून महापालिका आयुक्तांवर नगरविकास विभागाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर दबाब आणला जात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. त्यांच्या महत्वाकांक्षेला खतपाणी घालण्याचे काम नगरविकास विभागाकडून केले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 महापालिकेचा विभाग कार्यालये सक्षमीकरणावर भर