‘खाडीवरची माडी' कादंबरी प्रकाशित 

गज आनन म्हात्रे लिखित ‘खाडीवरची माडी' कादंबरीचे प्रकाशन संपन्न

नवी मुंबई : लेखक गज आनन म्हात्रे लिखित खाडीवरची माडी या मराठी कादंबरीचे प्रकाशन १८ मे रोजी  साहित्यिक प्रा.एल.बी.पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिका श्रीमती सुनिता जोशी यांच्या हस्ते नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक भवन येथे संपन्न झाले.

प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक एल.बी.पाटील यांनी आपण ही कादंबरीची १०३ पाने एका दमात वाचल्याचे सांगतानाच ती ओघवती झाल्याचे नमूद केले. कादंबरीतील प्रेम हे निष्पाप, अल्लड आहे. म्हात्रे दहावीत तर ती मुलगी आठवीत असे हे कोवळे प्रेम आहे. असे प्रेम बरेच लोक करतात पण कुणास सांगत नाहीत. या कादंबरीच्या माध्यमातून म्हात्रे यांनी ते सांगण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट करत ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरेल, असे ते म्हणाले. पनवेेलच्या ज्येष्ठ साहित्यिका सुनिता जोशी यांनी चांगली कादंबरी कशी असावी याचा उहापोह करताना वाचकांस खिळवून ठेवते ती उत्कृष्ट कादंबरी असे सांगितले व या कादंबरीवर पनवेलमधे चर्चासत्र घेण्याची तयारी दर्शवली. कादंबरीचे लेखक गज आनन म्हात्रे यांनी आपल्या मनोगतात मिठागर व्यापारी सतारशेटच्या मालकीची ही खाडीवरची माडी नेरुळ येथील आगरी कोळी भवनच्या बाजूला होती असल्याची माहिती देताना  सांगतले की भारत पाकिस्तान फाळणीनंतर तो सतारशेट माडी विकून पाकिस्तानात जाण्यापूर्वी ती भावेशेट यांनी विकत घेतली होती; १९७० साली सिडकोने भातशेती/मिठागरे संपादित केल्यावर ही माडी ओस पडली होती. १९८५ साली ती पडली, जमीनदोस्त झाली. याच माडीवर आधारित ही कादंबरी असल्याचे ते म्हणाले. सिडको कामगार युनियनचे माजी अध्यक्ष निलेश तांडेल यांनी या माडीबद्दल आठवणी सांगीतल्या. करावे, नेरुळ गावचे तत्कालीन विद्यार्थी माडीजवळ अभ्यास करीत व दुमजली माडी, फळझाडांची बाग, कारंजा ही त्या माडीची श्रीमंतीची लक्षणे होती. माडीसोबत भातशेती, मिठागरे, बंदर, खाडी, मासेमारी, गावे याबाबतीत म्हात्रे यांनी या कादंबरीत वर्णन केले आहे. पन्नास पंचेचाळीस वर्षा पूर्वीचा ईथला निसर्ग, लोकजीवन या कादंबरीत उतरले असावे असे तांडेल म्हणाले. ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी गज आनन म्हात्रे यांचे ज्येष्ठ नागरिक संघ सभागृहात  हे दुसरे पुस्तक प्रकाशित होत असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशीत होवो अशा शुभेच्छा दिल्या. सुचित्रा कुचमवार यांनी नेटके सूत्रसंचालन केले. लेखक कादंबरीकार गज आनन म्हात्रे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी नगरविकास विभागाचा महापालिका प्रशासनावर दबाव